जालन्यात दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनिमाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:29 PM2019-02-05T14:29:40+5:302019-02-05T14:30:02+5:30
चोरट्यांनी भरदिवसा मारहाण करून लुटल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात केली होती.
जालना : साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज बेड्या ठोकल्या. पुजाआप्पा दुकानदार (रा. जिंतूर) असे अटकेतील मुनिमाचे नाव आहे.
जिंतूरच्या सराफा व्यापाऱ्याने गेल्या शनिवारी जालन्यात मुनीमाला सोने-चांदी खरेदी करून आणण्यासाठी पाठविले होते. जालन्यातील सुराणा ज्वेलर्स येथून 100 ग्राम सोने आणि पावणेतीन किलो चांदी मुनिमाने खरेदी केली होती. त्यानंतर मुनिमाने ऑटोरिक्षातून जात असताना चोरट्यांनी भरदिवसा मारहाण करून लुटल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात केली होती.
भरदिवसा झालेल्या लुटमारीच्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात लक्ष घालून 24 तासात गुन्ह्याचा बनाव उघडकीस आणत मुनिमाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून साडेचार लाखाचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथकाने या गुन्ह्याचा पर्दाफाश केला.