पासपोर्ट कार्यालयात महिन्याभराची वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:20 AM2019-05-03T01:20:33+5:302019-05-03T01:21:22+5:30
वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. यामुळे जालनेकरांना दिलासा मिळाला आहे. संबंधितांना आता नागपुरच्या वाऱ्या बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
परराष्ट्र मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च २०१८ पासून जालना येथे पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज सुरु झाले आहे. प्रारंभीपासून अर्जदारांची संख्या वाढली आहे. जालना कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना जवळसपास एक ते दीड महिना वेटिंगवर राहावे लागत आहे. केवळ तीन कर्मचाºयावर सुरु असलेल्या या कार्यालयात दररोज ४० ते ४५ जणांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. एक वर्षाच्या कालावधीत जवळपास ९ हजार अर्ज आले असून येथील बहुतांश अर्जाची पडताळणी झाली आहे.
जालना येथे कार्यालय सुरु व्हावे, यासाठी नागरिक, व्यापा-यांनी मागणी केली होती. २६ मार्च पासून सुरु झालेल्या या कार्यालयात तातडीने सुविधा मिळत असल्याने अर्जदारांची सोय झाली आहे. यापूर्वी जालन्याच्या नागरिकांना नागपूर येथे जावे लागत होते. सध्या हजयात्रा, शासकीय कर्मचारी, तसेच उन्हाळी सुट्या, आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाºयांचे अर्ज अधिक आहे. या शिवाय जालन्यात कार्यालय झाल्यामुळे अनेकजण पासपोर्ट काढून घेत आहेत. नवीन असलेल्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून पी. आर. मोरे तर त्यांना सहायक म्हणून एन.जी. तोडकर ए ए. शेळके हे काम पाहत आहेत. मोरे हे परराष्ट्र मंत्रालयाकडून जालना कार्यालयात प्रमुख आहेत. तर स्थानिक पोस्ट कार्यालयातून दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. दररोज ४० जणांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आमंत्रिक केले जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम होत असल्याने अर्जदारही समाधान व्यक्त करत आहेत.
परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जाणाºया नागरिकांना पासपोर्ट काढायला पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागत असल्याने वेळ, आणि पैशा अधिक खर्च करावा लागत होता. आता जालन्यात कार्यालय झाल्याने चांगली सोय झाली आहे.
दरम्यान जालना येथील पासपोर्ट कार्यालयाचे व्यवस्थापक पी. आर मोरे म्हणाले. २६ मार्च कामकाज सुरु झाले आहे. दररोज किमान ४० ते ४५ जण पडताळणीसाठी येत आहे. या सुविधेमुळे नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याचे नागरिक सांगत आहेत.