राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:08 AM2017-12-29T00:08:59+5:302017-12-29T00:09:16+5:30
राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, ही संख्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, ही संख्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिली. येथील जिल्हा कारागृहात गुरुवारी कैद्यांसाठी आयोजित विशेष प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी ह.भ.प. दिनकर पाठक, कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे, तुरुंगाधिकारी एस. बी. निर्मळ, आनंद टेंगले, हिदायत तांबोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. महानिरीक्षक डॉ. जाधव म्हणाले, की कारागृहांमध्ये अधिक असलेली कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी वागणुकीत सुधारणा होत असलेल्या कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी करणे, जामिनावर सोडणे इ. प्रक्रिया राबवली जात आहे.
तसेच उपलब्ध कारागृहांमधील कक्षांची संख्या वाढविण्याबरोबर मुंबई आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्तावित आहे. राज्यभरातल्या कारागृहांमध्ये कीर्तन, प्रवचन यासारखे उपक्रम घेतले प्राधान्याने राबविले जात आहेत. यातून अनेक कैद्यांच्या वागणुकीत सुधारणा होत आहे. या वेळी डॉ. जाधव यांनी संपूर्ण कारागृहाच्या परिसरात फिरून तपासणी केली. कैद्यांना दिले जाणारे जेवण, वैद्यकीय सुविधा, जेवणाची भांडी याची डॉ. जाधव यांनी तपासणी केली.
जिल्हा कारागृहाचे काम चांगले
जालना जिल्हा कारागृहाची इमारत सुसज्ज असून, येथे कैद्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल जॅमर बसविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.