मोसंबी जालन्यात, प्रक्रिया केंद्र पैठणमध्ये; फलोत्पादन मंत्र्यांनी साधली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:52 PM2021-12-24T17:52:15+5:302021-12-24T17:53:14+5:30
मोसंबीचे आगार जालना जिल्ह्यात असतांना सिस्ट्रेस इस्टेट केंद्र हे पैठणला हलविले आहे. याला कुठल्याच नेत्यांनी आक्षेप घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- संजय देशमुख
जालना : पूर्वीपासूनच मोसंंबीचे आगार म्हणून जालना जिल्ह्याची मराठवाड्यात ओळख आहे. तसेच या मोसंबीस जीआय नामांकनही जालन्यातील शेतकऱ्यांनी मिळवले असतांना केवळ फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी राजकीय ताकद वापरून हे सिस्ट्रस इस्टेट केंद्र पैठण येथे हलविल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वात जास्त मोसंबी उत्पादक शेतकरी हे जालना जिल्ह्यात असून, मराठवाड्यात मोसंबीचे एकूण क्षेत्र हे जवळपास चाळीस हजार हेक्टर आहे. पैकी २९ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र हे एकट्या जालना जिल्ह्यात आहे. त्यातच जालन्यातील शेतकऱ्यांनी जीआय नामांकनही प्राप्त केले असून, बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्रही आहे. त्यामुळे हे सिस्ट्रस केंद्र जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रात झाले असते तर, त्याचा अधिकचा उपयोग झाला असता, असा सूर शेतकरी खासगीत व्यक्त करत आहेत.
पैठण तालुक्यात केवळ उत्तरेला पाच ते सात हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड केली आहे. त्या तुलनेत जालना जिल्हा हा अग्रेसर आहे. या पैठण येथील सिस्टस केंद्रात उच्च दर्जाची रोपवाटिका तयार करणे, उच्च दर्जाचे कलम करून ते शेतकऱ्यांना देणे तसेच ग्रेडिंग, पॅकेजिंगची सुविधा होणार असून, मोसंबीची निर्यात वाढीला चालना देण्याचा उद्देश केंद्राचा आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी देखील १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष
मोसंबीचे आगार जालना जिल्ह्यात असतांना सिस्ट्रेस इस्टेट केंद्र हे पैठणला हलविले आहे. याला कुठल्याच नेत्यांनी आक्षेप घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे केंद्र पैठण येथे होत असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दुर्लक्ष केले आहे, कारण पैठण हा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे नेतेही गप्प आहे, कारण संदीपान भुमरे हे शिवसेनेचे मंत्री असून, ते जालना जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे जवळचे मित्र आहेत. तर, दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आ. कैलास गोरंट्याल यांनी देखील ही बाब पाहिजे तेवढी गंभीरतेने घेतली नाही.