ग्रामीण भागात कोरोनाचे सर्वाधिक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:41+5:302021-07-26T04:27:41+5:30
जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेेची संभावना लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ...
जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेेची संभावना लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या विळख्यात आजवर ११७६ जणांचा बळी गेला आहे. सर्वधिक मृत्यू ग्रामीण भागातील रुग्णांचे झाले असून, त्याचे प्रमाण ६० टक्के आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील २६ टक्के रुग्ण कोरोनाचे बळी ठरले असून, इतर जिल्ह्यातील १४ टक्के रुग्णांचा जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दीड वर्षापासून जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाची रुग्णसंख्या सध्या घटली आहे. रुग्णसंख्या घटल्याचे चित्र दिलासादायक असले तरी दैनंदिन आढळणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यात डेल्टा प्लसमुळे शिथिल केलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ६१ हजार ३८८ रुग्ण आढळले होते. त्यात ११७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ६० हजार १४९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातील ११७७ मयतांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७०१ (६० टक्के), शहरी भागातील ३१० (२६ टक्के) तर इतर जिल्ह्यातील १६६ (१४ टक्के) रुग्णांचा समावेश आहे. गत महिनाभरापासून रुग्णांची संख्या घटली आहे. असे असले तरी दैनंदिन आढळणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. त्यात शासनानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला असून, त्यादृष्टीने पावलेही उचलली जात आहेत.
७४९ पुरुषांचा मृत्यू
जिल्ह्यातील ११७७ मयतांमध्ये ७४९ पुरुषांचा समावेश आहे. तर ४२९ महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे यावरून दिसून येत आहे.
तीन महिने ठरले घातक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने अधिक घातक ठरले. यात मार्चमध्ये १०३, एप्रिलमध्ये २८९ आणि मे महिन्यात तब्बल २९५ जणांचा बळी गेला. जून महिन्यात ७२, जुलै महिन्यात १७ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे.
ज्येष्ठांनाच अधिक धोका
आजवर झालेल्या मयतांचे प्रमाण पाहता ५० वर्षांवरील मयतांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. २१ ते ३० वर्षे वयोगटात २०, ३१ ते ४० वयोगटात ८६, ४१ ते ५० वयोगटात १६७, ५१ ते ६० वयोगटात ३१३, ६१ ते ७० वयोगटात ३४७, ७१ ते ८० वयोगटात १८३, ८१ ते ९० वयोगटात ५५ तर ९१ ते १०० वयोगटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
सूचनांचे पालन गरजेचेच
सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून, निर्बंधांचे पालन करून व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोराेनाचा संभाव्य धोका पाहता नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर, सुरक्षित अंतरासह इतर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे आणि वेळेवर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
तालुका मयत
अंबड १३५
बदनापूर- ६०
भोकरदन ७५
घनसावंगी ९१
जाफराबाद- ६४
जालना ४२१
मंठा- ५०
परतूर- ७३
इतर जिल्हे- २०८