आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून कोरोनाकाळातही मुलांना पाठविले शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:47+5:302021-07-22T04:19:47+5:30
जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये शाळा सुरू लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कशाबशा सुरू झाल्या ...
जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये शाळा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कशाबशा सुरू झाल्या आहेत. अद्याप संपूर्ण जिल्ह्यातील शाळा सुरू होणे बाकी आहे; परंतु ज्या गावामध्ये महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नाही, अशा गावांमध्ये या शाळा सुरू झाल्या आहेत.
शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालकांकडून मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी पूर्वीइतका आग्रह धरला जात नाही. कोरोना अद्याप पूर्णत: नियंत्रणात आला नसल्याने पालक काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत आहेत; परंतु ज्या क्षमतेने शाळांची मैदाने आणि वर्ग फुलून जात होते ती संख्या गाठणे आता शक्य नाही. सम आणि विषम हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सांगितले जाते; परंतु ज्याठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण असून, दीड वर्षापासून हे विद्यार्थी एक प्रकारे बंदिस्तच झाले होते.
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा!
कोरोनामुळे आजही घरात प्रवेश करताना बहुतांश ठिकाणी बाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे हे घराबाहेरच ठेवण्याचा आग्रह केला जात आहे. त्यातच अनेक पालक हे विद्यार्थ्यांना अंघोळ करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत; परंतु या दोन्हींसाठी विद्यार्थ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसून, शाळेतून घरी आल्यावर कधी एकदा तणावमुक्त होतो, याकडेच कल आहे.
अ) मास्क काढू नये.
ब) हात साबणाने वारंवार धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे.
क) सोशल डिस्टिन्सिंग पाळावे.
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.
काळजी आहेच; पण शिक्षणही महत्त्वाचे!
दीड वर्षापासून कोरोनामुळे मुले घरातच होती; परंतु आता काही गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी भीती कायम असून, सर्व ती काळजी घेण्याच्या सूचना देऊनच शाळेत पाठविले जाते. -अरुणा थोरे
शैक्षणिक सत्र थोडेबहुत का होईना सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल, यात शंका नाही. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण द्यावे.
-शीला नरुटे
ऑनलाइनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून शिक्षण घेत होते; परंतु प्रत्यक्ष शाळेत जाऊन जे शिक्षण मिळते ते अधिक लवकर आत्मसात होते. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांची चिडचिड वाढली होती. -ज्योती गुळवणे