चक्का जामच्या पार्श्वभूमीवर शहरातून मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:43 AM2018-08-13T00:43:13+5:302018-08-13T00:43:42+5:30
मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा आरक्षणआंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या पाश्वभूमीवर रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती.
धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा ही गेल्या अनेक वर्षापासून समजाची मागणी आहे. असे असताना याकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे.या संदर्भात १२ आॅगस्टची डेडलाईन सरकारला दिली होती. मात्र त्यावर काहीच निर्णय झाल्याने हे आंदोलन अटळ असल्याचे सकल धनगर समाजाच्यावतीने सांगण्यात आले.
या आंदोलनानिमित्त रविवारी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत चक्का जाम आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेऊन नियोजन करण्यात आल्याची माहिती एका निवेदनाव्दारे देण्यात आली. हा चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करून रूग्ण, वयोवृध्द व लहान मुलाची गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. या बंदसाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठक संपल्यानंतर शहरातील संभाजी उद्यान येथून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीचा समारोप शिवाजी महाराज पुतळ्या जवळ करण्यात आला.