लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 07:47 PM2024-11-22T19:47:55+5:302024-11-22T19:48:34+5:30
खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे.
भोकरदन/ वरुड बु, ( जालना) : घरासमोर हळदीचा मंडप सजला होता, तीन तासाने हळद लागणार असतानाच वधूवर काळाने झडप घातल्याने लग्नघरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वरुड ( बु) या गावच्या शिवारात दुचाकी आणि चारचाकीच्या झालेल्या अपघातात वधू आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरुन पिंपळगाव रेणुकाईवरुन दोघे भोकरदनकडे जात होते. तर भोकरदनकडून चारचाकीत दोन दिवसाने लग्न असलेली नवरी आणि तीचे नातेवाईक पारधकडे येत होते. माञ, वरुड ( बु) या गावच्या शिवारात अचानक दुचाकी आणि चारचाकीची समोरसमोर धडक झाली. यात दोन्ही वाहने बाजुच्या नाल्यात उलटली. यात चारचाकीमधील नवरी पूनम बनकर (30) आणि दुचाकीवरील भारत बालाजी चव्हाण ( 54, रा. बुलढाणा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सोनू माऊली वाघमारे (13) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचे साहित्य आणण्यासाठी गेली होती. माञ, रस्त्यातच नियतीने डाव साधल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आज होती हळद, रविवारी लग्न
पूनम बनकर हिचा अजिंठा येथील मुलाशी रविवारी ( दि. 24) पारध येथे विवाह होणार होता. लग्नासाठी पूनम मुबंई येथून पारधला आली होती. आज सायंकाळी तिची हळद होती. दरम्यान, दुपारी देवदर्शन आणि सामान खरेदीसाठी पूनम नातेवाईकांच्या सोबत भोकरदनला आली होती. त्यानंतर सायंकाळी सर्वजण चारचाकीने पारधकडे निघाले. यावेळी बंडारगडाजवळ रस्त्यात खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे.