धनगर आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:11 AM2018-08-14T01:11:21+5:302018-08-14T01:11:35+5:30

धनगर समाजाला आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी शहरासह जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

Movement of the flyover for Dhanagar reservation | धनगर आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन

धनगर आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : धनगर समाजाला आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी शहरासह जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करून यळकोट...यळकोट..जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर मेंढ्या तसेच जागर, गोंधळचा कार्यक्रम घेण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
जालना शहरात औरंगाबाद, अंबड चौफुली, सिंदखेड नाका यासह तालुक्यातील पीरपिंपळगाव, रामनगर, वीरेगाव, गोलापांगरी येथे रास्ता रोको करण्यात आला. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासह आरक्षणासाठी बलिदान देणारे परमेश्वर घोंगडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला १२ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने धनगर समाजाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आरक्षणासाठी धनगर समाजाची भव्य रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर: आरक्षणासाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी रॅली काढून शहरात बंद पाळण्यात आला.
धनगर समाजाच्या सोमवारी सर्वत्र बंद व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विविध मागण्या मान्य करण्यासाठी शहरात बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे, मेंढ्यांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे. शेळ्या मेंढ्यांची निर्यात करणे, धनगर समाजाच्या उन्नती साठी शेफर्ड आयोगाची नेमणूक करणे, इ. प्रलंबित मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
यापूर्वी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
या धरणे आंदोलन आणि रॅलीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. ही रॅली नंतर पुढे वाटूर कडे रवाना झाली.
भोकरदन येथे मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : धनगर समाजाला एस़टी़ प्रवर्गात समावेश करून या समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी अहिल्याबाई होळकर चौकातून उपविभागीय कार्यालयापर्यंत यळकोट.. यळकोट.. जय मल्हार च्या षोषणा देत समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता़
सोमवारी तालुक्यातील सर्व समाज बांधव नवे भोकरदन येथील अहिल्याबाई होळकर चौकात जमा झाले होते. येथून पंचायत समितीमार्गे हा मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला.
या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने काही काळ ठिय्या अांंदोलन करण्यात आले शिवाय त्यांच्या पारंपरिक पध्दतीने डफ वाजवून आरक्षणाची मागणी केली. त्याच प्रमाणे या सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना निवेदन दिले. या मोर्चात माजी नगराध्यक्ष शेषराव सपकाळ, श्रीराम सोरमारे, विलास काळे, शोभा मतकर, बाबासाहेब मतकर, सुरेश दिवटे, विजय मतकर, मधुकर मुकुटराव, गुलाबराव बकाल, लक्ष्मण घोलप, योगेश सोरमारे, अजय मतकर, शंकर सपकाळ, प्रकाश सपकाळ, अमोल लवंगे, कैलास आदबाने, गणेश आदबाने यांच्यासह धनगर समाजबांधव सहभागी झाले होते़
धनगर आरक्षणासाठी घनसावंगीत कडकडीत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी सोमवारी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी एका शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी संजय ढवळे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी तहसीलसमोर ठिय्या आंदोलन केले.
उपजिल्हाधिकारी ढवळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात आरक्षणासह अन्य मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात शिवसेनेचे नेते डॉ. हिकमत उढाण यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. ओबीसी सेलचे अध्यक्ष भास्कर गाढवे नगराध्यक्ष राजभाऊ देशमुख, बाबूराव देशमुख, दिगंबर उगले, अशोक शेलारे, बापूराव देशमुख, जीवन वैगरे, शिवाजी टेळे, चंदू खरात, यांच्यासह धनगर समाज बांधवाची उपस्थिती होती.

Web Title: Movement of the flyover for Dhanagar reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.