निम्न दुधनाचे पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:57 AM2019-05-07T00:57:55+5:302019-05-07T00:58:26+5:30
निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी आता परभणीकडे सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे जिल्हा संघटक तथा नगर पालिकेतील गटनेते मोहन अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी आता परभणीकडे सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे जिल्हा संघटक तथा नगर पालिकेतील गटनेते मोहन अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
परतूर येथे सोमवारी गटनेते मोहन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना मोहन अग्रवाल म्हणाले की, निम्न दुधना प्रकल्पात आता केवळ मृतसाठा आहे. यापुर्वीही तीन वेळा पाणी सोडण्यात आले होते. या धरणाच्या पाण्यावर परतूर, मंठा व सेलूसह अनेक खेड्याचा पाणीपुरवठा अवलबंून आहे. पाणी सोडल्यास या गावांना पाणी मिळणार नाही. मंत्री मंडळाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या धरणातून पाणी सोडल्यास त्या पाण्याची नासाडी होईल. नदीच्या पात्रातून सोडलेले पाणी परभणीपर्यंत पोहोचेल की नाही, याची शाश्वती नाही. मे व जून असे दोन महिने या पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. या धरणातील पाणी सोडण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात आम्ही औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहोत. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. या धरणातून परभणीकडे पाणी सोडल्यास मोठा लढा उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक अंकुश तेलगड, श्रीकांत उन्मुखे, सुधाकर सातोनकर, राजेश खंडेलवाल, प्रकाश चव्हाण, राजेश मुंदडा, विदूर जईद यांची उपस्थिती होती.