रोहयोच्या कामासाठी शिवसंग्रामचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:08 AM2019-02-03T01:08:00+5:302019-02-03T01:08:44+5:30
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिलागड : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे, २५ ते ३० फूट पाणी असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
जिल्हाभरात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, पाण्याबरोबरच नागरिकांच्या हातालाही काम मिळत नाही. त्यातच सरकारने अद्यापही रोहिलागड परिसरात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु केली नसल्याने ग्रामस्थांना घरीच बसावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ रोहयोची कामे सुरु करावी, दुष्काळाच्या उपाय योजना राबवाव्यात यासह विविध मागण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने शनिवारी विहिरीत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दुपारी तालुका कृषी अधिकारी डॉ. डी. एस. तारगे, मंडळाधिकारी वैद्य, जमादार शेळके यांनी आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, अंबड तालुकाध्यक्ष बळीराम शेळके, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काळवणे, काकासाहेब टकले, अण्णासाहेब टकले, नारायण टकले, विष्णू तार्डे यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळ असून, सरकार कोणत्याही योजना राबवत नाही. त्यामुळे हे आंदोलन केल्याचे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले म्हणाले.