शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:40+5:302021-01-24T04:14:40+5:30
जालना : जालना शहरातील विविध ठिकाणचे बंद पडलेले सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने हालचाली सुरू केल्या असून, ...
जालना : जालना शहरातील विविध ठिकाणचे बंद पडलेले सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच ३५ कॅमेऱ्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी ३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने मागील अनेक वर्षांपासून हे कॅमेरे बंद आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, याअगोदरच सीसीटीव्हीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात काही त्रुट्या असल्याने हा प्रस्ताव परत आला होता. त्याची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तालुका जालना, कदीम जालना या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाईल. मात्र, दोन्ही ठाणी व महिला तक्रार निवारण केंद्र, जिल्हा वाहतूक शाखा ही सर्व कार्यालये एकाच इमारतीत ठेवण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. वरिष्ठांकडून मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच काम सुरू केले जाईल. जिल्ह्यातील काही पोलीस चौकींना पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. याचा कामकाजावरही परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
एटीएम चोरट्यांच्या मागावर
जालना शहरातील एटीएम चोरणाऱ्या टोळीच्या मागावर पोलीस आहेत. लवकरच आम्ही या टोळीला जेरबंद करू. मध्य प्रदेशात अशा प्रकारे एटीएम चोरून नेणारी टोळी पकडण्यात आली आहे. या टोळीकडून काही माहिती मिळते का, याबाबत चौकशी सुरू आहे, असेही पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.
पेट्रोलपंपाचे काम रखडण्याची शक्यता
शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पेट्रोलपंप उभारण्यात येणार होता. परंतु, जागा लेव्हल करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने संबंधित कंपनीला खर्च करण्याचे सांगितले. परंतु, कंपनीने जागा लेव्हल करण्यासाठी खर्च करण्यास नकार दिला असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. त्यामुळे पेट्रोलपंपाचे काम रखडण्याची शक्यता आहे.