लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:47 AM2023-09-03T08:47:57+5:302023-09-03T08:48:17+5:30
घटनेनंतर शरद पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली.
अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : आंदोलनस्थळी सर्व काही सुरळीत होते. पोलिस आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत होते. तेव्हाच वरून (मंत्रालय) फोन आला. त्यानंतर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्या वरून आलेल्या फोनसह या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
घटनेनंतर खा. पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आंदोलकर्त्यांनी कायदा हातात घेण्याची कोणतीही कृती केलेली नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असतानाच पोलिसांचा हल्ला अमानवी आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. त्यांना हल्ला करण्याचा आदेश कोणी दिला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यायालयीन चाैकशीनंतर बऱ्याच गाेष्टी स्पष्ट हाेतील.
‘त्या’ घटनेनंतर मंत्र्यांनी राजीनामे दिले होते...
एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले, नागपुरात २८ वर्षांपूर्वी घडलेल्या गोवारी हत्याकांडाचा काहींनी उल्लेख केला. त्यांच्या माहितीसाठी त्या घटनेनंतर आदिवासीमंत्री मधुकरराव पिचड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही एका घटनेनंतर राजीनामा दिला होता. याची आठवण करून देत पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.