निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:59 PM2024-01-01T12:59:28+5:302024-01-01T13:01:14+5:30

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील शाळेत झाले बारावीपर्यंतचे शिक्षण

MPSC Result: Illiterate worker's son Sonu Aawate selected in MPSC; elected on two posts at the same time by Self-studying | निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी

निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी

- राहुल वरशिळ
जालना :
शहरातील कंपनी कामगार कुटुंबातील साेनू आवटे या युवकाने जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर ‘एमपीएससी’च्या परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यश संपादन करून वयाच्या २४ व्या वर्षी ‘सहायक कक्ष अधिकारी’ (ASO) आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांना एकाच वेळी गवसणी घातली आहे. सामान्य कुटुंबातील युवकाने या दोन्ही पदांवर मजल मारून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यात सोनूला दोन्हींपैकी एकाच पदाची निवड करावी लागणार आहे.

जालन्यातील गणपती गल्लीतील मगन आवटे व कलावती आवटे या दाम्पत्याला तीन मुले आहेत. या कुटुंबाकडे ६ एकर कोरडवाहू शेती असून, शेतीमध्ये मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागत नसल्याने वडील आणि मोठ्या भावाने शहरातील एमआयडीसीमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासोबतच मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. विशेष म्हणजे साेनू याचे वडील शिकलेले नाही; परंतु आपला मुलगा अधिकारी व्हावा, या भावनेने त्यांनी रात्रं-दिवस काम करून मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

आवटे यांची घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कसर सोडली नाही. त्यांचा मोठा मुलगा भाऊसाहेब आवटे एनआरबी कंपनीत हेल्पर, तर दुसरा मुलगा हर्षल हा नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत आहेत. साेनूचे इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयातून २०२१ मध्ये पूर्ण केले आहे.

सोनू याने २०२१ मध्ये ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा दिली; परंतु त्यात अपयश आले. त्यांनतर २०२२ मध्ये पुन्हा पूर्वपरीक्षा दिली. त्यात यश आल्यानंतर मुख्य परीक्षा ऑक्टोबर २०२३ मध्ये दिली. त्यातही यश मिळाले. या परीक्षेचा अंतिम निकाल २८ डिसेंबर रोजी जाहीर झाला. यात सोनूने यश संपादन करून ‘सहायक कक्ष अधिकारी’ (ASO) आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांना गवसणी घातली आहे. महाराष्ट्रातून एकूण २७ वा क्रमांक आणि अ.दु.घ. (EWS) प्रवर्गातून त्यांनी ४ था क्रमांक पटकाविला आहे.

कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर दिला जोर
कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर जोर दिला. यावेळी शिक्षक, मित्रांकडूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन व मदत मिळाली. कुटुंबाने सोसलेल्या हालअपेष्टा व कष्टाची जाणीव होती. त्यामुळे साेनूने जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेऊन दुसऱ्या प्रयत्नात बाजी मारली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून ‘सहायक कक्ष अधिकारी’ (ASO) आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांवर मजल मारणाऱ्या एकूण ५०० मुलांमधून निवड झाली आहे. सोनूची यशोगाथा ही ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे, यात तिळमात्र शंका नाही.

प्रतिकूल परिस्थितीवर मात
या युवकाने आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कामही केले. सोनूने कठीण काळातही शिक्षण व अभ्यासाची नाळ तुटू दिली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठल्याचे सोनूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संघर्ष जेवढा कठीण तेवढा यशाचा आनंद अधिक असतो, असेही यावेळी सोनू म्हणाला.

Web Title: MPSC Result: Illiterate worker's son Sonu Aawate selected in MPSC; elected on two posts at the same time by Self-studying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.