म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; गंभीर रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:09+5:302021-06-16T04:40:09+5:30
जालना : कोरोनानंतर उद्भवलेल्या म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात जवळपास ९२ रुग्णांना घेरले आहे. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून ४० जणांवर ...
जालना : कोरोनानंतर उद्भवलेल्या म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात जवळपास ९२ रुग्णांना घेरले आहे. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून ४० जणांवर यशस्वी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात जबडा अथवा कोणाचाही डोळा काढावा लागला नसल्याचे सांगण्यात आले.
जालना जिल्ह्यात कोरोनाने जवळपास साठ हजारपेक्षा अधिक रुग्णांना घेरले होते. यातून जवळपास ५९ हजार रुग्ण बरे झाले असून, १ हजार पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस हा आजार जडण्यामागे ज्या रुग्णांना जास्त दिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडली अशांच्या ओठांना किंवा डोळ्याच्या खाली काळे डाग, आढळून आले. याची जाणीव जागृती गतीने झाल्याने नागरिकांनी हा आजार अंगावर न काढता तातडीने रुग्णालय गाठले. या आजारावरील उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च येत होता. परंतु, नंतर या आजारावरील खर्चही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी जालन्यातील कान, नाक, घसा आणि नेत्रतज्ज्ञांना प्रशिक्षण दिले.
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिस लक्षणांमध्ये प्रामुख्याने नाक, ओठ आणि डोळे या अवयवाजवळ साधारणपणे आधी खाज येते. त्यानंतर काळे डाग पडू लागतात. ती खाज आल्यानंतर लगेचच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. या आजारामुळे संपूर्ण चेहरा काळवंडतो. जर वेळीच उपचार मिळाले नाही तर या आजाराचे जिवाणू हे थेट मेंदूपर्यंत जाऊन ते जीवघेणे ठरु शकतात.
म्युकरमायकोसिस हा आजार आपल्या विभागात प्रथमच आढळून येत आहे. तसा हा आजार जुनाच आहे परंतु, कोरोनानंतर याची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने या आजाराचे भय निर्माण झाले होते. परंतु आता या आजाराची लक्षणेे हळूहळू बोटावर मोजण्याएवढीच असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
जालना जिल्ह्यात आतापर्यंत ९२ जणांना म्युकरमायकोसिसने वेढले होते. यापैकी सहा जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर उर्वरित चाळीस जणांना आजारातून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. सध्या जालना येथील जिल्हा रुग्णालयात ४६ जणांवर उपचार सुरु आहेत.
-डॉ. प्रताप घोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
ही घ्या काळजी
म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून ऑक्सिजन देताना त्यामध्ये शुद्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. यासह चेहऱ्यावर काळे डाग आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून मार्गदर्शन घेतल्यास हा आजार जीवघेणा ठरत नाही.
जिल्ह्यात कोणालाही इजा झाली नाही
म्युकरमायकोसिसमुळे डोळे, जबडा, नाकाचा काही भाग यांना गंभीर इजा होऊ शकते. परंतु, जिल्ह्यात असे कुठलेच रुग्ण आढळून आले नाही.
या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असून, त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्याकडून लवकरच शस्त्रक्रिया करुन घेतल्या जातील.
या गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी हवी ती साधनसामग्री उपलब्ध नाही.
औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध
म्युकरमायकोसिसवर लागणाऱ्या औषधींचा साठा सध्या उपलब्ध आहे. हा साठा मिळावा म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मध्यंतरी म्युकरमायकोसिसवरील प्रभावी ठरणारे लिपोसोमल ॲम्फोटेरेसन बी हे औषध मागणी करुनही मिळत नव्हते. एका रुग्णाला या इंजेक्शनचे जवळपास ६० डोस द्यावे लागत असल्याने त्याची टंचाई होती.