कवयित्री दुधाळ यांना मुद्रा साहित्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:52 AM2017-12-30T00:52:20+5:302017-12-30T00:53:06+5:30
येथील फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘वेणूताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील दौंड येथील कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे.
जालना : येथील फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘वेणूताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील दौंड येथील कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार संयोजन समितीचे कैलास भाले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
संस्थेच्या वतीने दिल्या जाणा-या या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या एक जानेवारीला सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अमरावती येथील ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोज तायडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभात कवी राम गायकवाड यांच्या ‘उसवताना’ या कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
या कविता संग्रहावर डॉ. शशिकांत पाटील भाष्य करतील. साहित्य रसिकांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे डॉ. गजानन जाधव, राम गायकवाड, विमल कांबळे, किशोर घोरपडे, रमेश देहडकर, नवीन पिंपळगावकर यांनी केले आहे.