मुंगडा.. मुंगडा... गाण्यावर केंद्रीयमंत्र्यांचा डान्स; बुलेट चालवत, खांदे उडवत दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:23 PM2023-05-22T16:23:51+5:302023-05-22T16:25:42+5:30
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या पत्नीसमेवत संबळ वाद्यावर डान्स केला होता
मुंबई/जालना - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या हटके शैलीमुळे आणि सर्वसाधारपणामुळे अनेकदा मीडियाचे लक्ष वेधून घेतात. कधी बैलागाडी चालवताना दिसतात, तर कधी जुन्या मित्रांसमवेत शेतात अंगत-पंगत जेवताना पाहायला मिळतात. त्यामुळे, त्यांच्या साधेपणाची नेहमीच चर्चा होत असते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवून श्रमदान केले होते. यावेळी, स्वत: हाती कुऱ्हाड घेऊन स्वच्छता केल्याचं दिसून आला. आता, रावसाहेब दानवे यांनी भापजच्या बाईक रॅलीत सहभागी घेत बुलेट चालवली. तर, खांदे उडवत डान्सही केला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या पत्नीसमेवत संबळ वाद्यावर डान्स केला होता. आपल्या दिंडोरी मतदारसंघातील गावात पारंपरीक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी चक्क पत्नीला खांद्यावर उचलून घेतले, आणि डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेटवर स्वार होऊन मुंगडा मुंगडा... या जुन्या व लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
मुंगडा... मुंगडा... गाण्यावर खांदे हलवत रावसाहेब दानवे यांनी बुलेटवर डान्स केला. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये आज भाजपच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत दानवे यांनी बुलेट चालवत सहभाग घेतला. तसेच, रॅलीमध्ये डीजेवर मुंगडा ... मुंगडा... गाण्यावर खांदे हलवत डान्सही केला आहे. यावेळी दानवेंच्या मागच्या सीटवर भाजप आमदार नारायण कुचे यांनीही हात उंचावत प्रतिसाद दिला. सध्या दानवेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर, अनेकजण आपलं मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी हाती कुऱ्हाड घेवून घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशयाच्या भिंतीवरील काटेरी झुडपे तोडली. या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या श्रमदान मोहिमेत रविवारी दानवे यांनी सहभाग नोंदवून श्रमदान करीत सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.