नेहरू रोड, कादराबाद भागातील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:58 AM2019-06-03T00:58:12+5:302019-06-03T00:59:07+5:30
दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील अत्यंत महत्त्वाची व्यापारपेठ असलेल्या नेहरु रोड आणि कादराबाद भागातील रस्ते रूंद केल्यास त्याचा आणखी लाभ व्यापाऱ्यांना होणार असून, नियमित होणारी वाहतुकीची कोंडी या निमित्ताने दूर होण्यास मदत मिळणार आहे. यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला असून, दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालन्यातील मुख्य सराफा बाजारपेठ म्हणून नेहरूरोडची ख्याती आहे. हा रस्ता आताच्या वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरा पडत आहे. वाढलेली वाहनांची संख्या, पार्किंगचा निर्माण होणारा प्रश्न, वेळावेळी होणारी वाहतूकीची कोंडी यामुळे येथील व्यापारी तसेच खेरदीसाठी आलेले ग्राहकही वैतागले आहेत. यावर उपाय म्हणून या भागाचे मास्टर प्लॅन अर्थात रस्ता रूंदीकरण करण्यासाठीची चर्चा यापूर्वीच विद्यमान केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन केली होती. त्यात काही व्यापा-यांनी याला सकारात्मकता दर्शवली होती, तर काहींनी याला विरोध केला होता.
आज शहराची व्याप्ती वाढत असून, शहरात आता नवनवीन संस्था उभारल्या जाणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ हा जालेकरांनाच होणार आहे.
परंतु अन्य शहरांच्या तुलेनेने जालन्यातील बाजाराचा टक्का आणि उलाढाल ही मोठ्या प्रमाणावर आहे. ती पूर्वापार असली तरी, आताची बाजारपेठ ही अपुरी पडत आहे. त्यामुळे अरूंद रस्ते रूंद करून ते दोन पदरी करण्याचा विचार पुढे आला. यामुळे एक सर्वेक्षण म्हणून नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नोटीस पाठविल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.
या नोटीसा केवळ एक प्राथमिक पातळीवर उपाय आहे, यात नंतर कोणत्या घराचा किती भाग जाणार आहे, हे मोजणी नंतरच पुढे येणार आहे.
ही अतिक्रमण काढण्याची मोहीम नसून, ही रस्ता रूंदीकरणाची मोहीम आहे. त्यात ज्यांच्या घराचा जेवढा परिसर जाईल तेवढा मावेजा त्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार देण्यात येणार आहे. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
मास्टर प्लॅन
जुना जालना भागात गांधीचमन ते काळी मशीद दरम्यान १९८२ ते १९८८ दरम्यान झाले होते. त्यामुळे आज गांधीचमन ते कचेरीरोड हा रस्ता बराच रूंद आहे. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना जो मावेजा मिळाला होता, तो अत्यंत कमी होता. परंतु आजचे भाव हे त्यावेळच्या तुलनेने वाढले आहेत. त्यामुळे आजच्या बाजार भावाप्रमाणे नागरिकांना त्यांचा मावेजा मिळू शकतो.
आज केवळ नोटीसा बजावल्या असून, त्यावर हरकती, सूचना मागवून नंतर स्वतंत्र आराखडा तयार करून तो राज्य सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येऊन नंतरच हे रस्ता रूंदीकरण सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.