रुग्णांच्या जिवाशी मुन्नाभार्इंचा खेळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:16 PM2017-11-24T23:16:40+5:302017-11-24T23:16:53+5:30
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना गावात येणा-या बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत आहेत.
जालना : ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना गावात येणा-या बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत आहेत. कुठलीही वैद्यकीय पदवी नसणारे हे मुन्नाभाई केवळ अनुभवाच्या आधारे रुग्णांवर उपचार करून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. या प्रकाराकडे आरोग्य विभागाने कानाडोळा केला आहे.
डॉक्टर हे परमेश्वराचे रूप आहे, असे मानून सर्वसामान्य व्यक्ती विश्वासाने डॉक्टरांकडून उपचार घेतात. डॉक्टर जे देईल, ते औषध घेतात. परंतु बोगस डॉक्टरांकडून घेतलेल्या उपचारांमुळे ग्रामीण भागात अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचे प्रकार समोर येत आहेत. जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार मिळत नसल्याने या केंद्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे. रेवगाव येथील एका डॉक्टरला गुरुवारी तालुका आरोग्य अधिका-यांनी नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. अशीच स्थिती अन्य तालुक्यांमध्येही आहे. कुठलीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसणारे हे डॉक्टर ग्रामीण भागात हातातील सुटकेसमध्ये काही औषध-गोळ्या, गळ्यात स्टेथॅस्कोप घालून फिरताना दिसतात. ग्रामीण भागातील रुग्णांवर आपली पोळी भाजता येईल, हे ठाऊक असल्याने बोगस डॉक्टर रुग्णांकडून कधी पैसे तर कधी धान्य, भाजीपाला, डाळ इ. साहित्य घेऊन उपचार करतात. मात्र, या बदल्यात केले जाणारे उपचार आपल्या आरोग्यास हितकारक नाही तर अपायकारक आहे याची जाणीव ग्रामीण भागातील नागरिकांना अज्ञानापोटी नसते. परिणामी आरोग्यावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतात. बाजार गावांमध्ये छोटेसे रुग्णालय थाटून बसणारे काही बोगस डॉक्टर एखादा गंभीर आजाराही आपण बरा करून, असा दावा करतात. या डॉक्टरांच्या खोट्या दाव्यांना बळी पडून काही सुशिक्षित आपल्या आजाराला कंटाळून सारासार विचार न करता अशा बोगस डॉक्टरांच्या नादाला लागतात. मात्र, हे बोगस डॉक्टर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मूर्ख बनविण्याचे काम करतात. साधा ताप किंवा सर्दी झालेली असेल तरी चार-पाच तपासण्या करून त्यांच्याकडून पैसे उकळतात. वैद्यकीय क्षेत्राचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्या व्यक्तीला नेमका कोणता आजार जडला आहे, हे ते सांगू शकत नाहीत. अशा वेळी नको ते औषध देऊन वेळकाढूपणा केला जातो. या दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर बोगस डॉक्टर रुग्णाला शहरी भागातल्या ओळखीच्या डॉक्टरांचा पत्ता देऊन भरती होण्याचे सांगतात, ही एका प्रकारची साखळी पद्धत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एखाद्या वेळस उपचारास उशीर झाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने झालेल्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू होतो. अशा बोगस डॉक्टरांमध्ये वैद्यकीय क्षेत्राबाबत लोकांची विश्वासार्हता ढासळत असून, प्रामाणिकपणे काम करणाºया डॉक्टरांना बसत असून त्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे.
---------------