खून प्रकरणातील आरोपी चार महिन्यांनंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:08 AM2020-02-28T00:08:35+5:302020-02-28T00:09:29+5:30
मजूर पुरवठ्याच्या कारणावरून एका कंत्राटदाराचा खून केल्याप्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, भोकरदन पोलिसांनी बुधवारी मध्य प्रदेशातील खुर्दी गावाच्या परिसरातून जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मजूर पुरवठ्याच्या कारणावरून एका कंत्राटदाराचा खून केल्याप्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, भोकरदन पोलिसांनी बुधवारी मध्य प्रदेशातील खुर्दी गावाच्या परिसरातून जेरबंद केले. ही घटना ७ आॅक्टोबर रोजी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली होती.
शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे यांचा ७ आॅक्टोबर रोजी २०१९ रोजी सायंकाळी गोळ्या घालून खून केला होता. या प्रकरणात पाच जणांविरूध्द बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तिघांना जेरबंद केले होते. या प्रकरणातील आरोपी राजसिंग उर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी हा घटनेनंतर फरार होता. कलानी हा मध्य प्रदेशातील मानपूर ठाण्याच्या हद्दीतील खुर्दी गावात असल्याची असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व भोकरदन पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने बुधवारी खुर्दी गावाच्या परिसरात कारवाई करून राजसिंग उर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी याला जेरबंद केले. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. अधिक तपास भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय हे करीत आहेत. मोक्का न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपासाधिकारी जायभाय यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पठाण, पोकॉ जगदीश बावणे, पोकॉ गणेश पायघन, सागर देवकर, सोमनाथ उबाळे, रवी जाधव यांच्या पथकाने केली.
व्हॉटसअॅपवरून काढला आरोपीचा माग
शेलगाव येथील खून प्रकरणातील आरोपी मध्य प्रदेशातील खुर्दी येथे राहत होता. तो मोबाईलचा उपयोग करायचा. मात्र, विना सीमकार्डचा मोबाईल वापरून तो केवळ व्हॉटस्अॅप कॉलिंगवर संपर्कात होता. त्यामुळे आरोपीचा माग काढणे पोलिसांसमोर आव्हान होते. बऱ्याच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आमचे पथक आरोपीपर्यंत पोहोचले.
- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना