पैसे मागण्याच्या कारणावरून कामगाराचा खून; अडीच महिन्यानंतर कदीम पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 04:40 PM2023-03-22T16:40:05+5:302023-03-22T16:40:33+5:30
४ जानेवारी रोजी जालना रेल्वेस्थानकापासून जवळ नरेशचा मृतदेह सापडला.
जालना : अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या हैद्राबाद येथील कामगाराच्या मृत्यू प्रकरणी मंगळवारी रात्री कदीम जालना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश यादीभाई लिंगीचेट्टी (रा. हैद्राबाद, आंधप्रदेश) असे मयताचे नाव आहे. कामाचे पैसे मागण्यावरून संशयित विनोद शहा, दिपेश शहा, भावेश शहा, जिग्रेश शहा (सर्व रा. जालना) यांनी हा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हैद्राबाद येथील नरेश लिंगीचेट्टी याचे जालना शहरातील संशयित विनोद शहा, दिपेश शहा, भावेश शहा व जिग्रेश शहा यांच्याकडे कामाचे पैसे व त्याच्या वडिलांचा पीएफ आणि कमिशनचे तीन लाख रुपये बाकी होते. नरेश हा त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत होता. परंतु, संशयितांनी त्याला पैसे न देत हाकलून दिले. शिवाय, परत पैसे मागायला येऊ नको, आलास तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. नंतर नरेशने ३ जानेवारी २०२३ रोजी एक चिठ्ठी लिहिली. त्यात तो म्हणाला की, माझ्या जिवाला धोका आहे जर माझ्या जिवाला काही झाले तर संशयित आरोपी याला जबाबदार असतील, असे त्याने चिठ्ठीत म्हटले.
४ जानेवारी रोजी जालना रेल्वेस्थानकापासून जवळ नरेशचा मृतदेह सापडला. या प्रकरणी कदीम जालना ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. खून करून नरेशचा मृतदेह रेल्वेस्थानक परिसरात आणून टाकल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. नंतर मयताची आई भाग्यामॉ यादीभाई लिंगीचेट्टी यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री संशयितांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मजहर सय्यद हे करीत आहेत.