एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धेचा घरात आढळला मृतदेह, तपासात खून झाल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:03 PM2022-12-19T17:03:45+5:302022-12-19T17:05:14+5:30
पार्वतीबाई यांना एक मुलगी आणि सावत्र मुलगा असून मुलगी सासरी तर मुलगा गावातच वेगळा राहतो.
- फकिरा देशमुख
भोकरदन( जालना) : तालुक्यातील लिंगेवाडी येथील पार्वतीबाई रंगनाथ शिंदे या ८० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी ( दि. १८ ) दुपारी 12 वाजता लिंगेवाडी येथील घरात पार्वतीबाई शिंदे या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर काही खुणा आढळून आल्या. शवविच्छेदनाच्या अहवालातून वृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सपोनि पोलिस रत्नदीप जोगदंड यांनी दिली.
व्याजाच्या व्यवहारातून खून?
पार्वतीबाई यांना एक मुलगी आणि सावत्र मुलगा आहे. मुलगी औरंगाबाद येथे तर सावत्र मुलगा गावातच वेगळा राहतो. त्या घरी एकट्याच राहतात. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत. मात्र, पार्वतीबाई यांचा खून व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून झाल्याची चर्चा गावात आहे.