बांधाच्या वादावरून चुलत्याकडून पुतण्याची हत्या, जानेफळ दाभाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 08:11 PM2023-06-23T20:11:50+5:302023-06-23T20:12:26+5:30
जानेफळ दाभाडी येथील संशयित शिवाजी जयाजी मिसाळ व त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा गट क्रमांक ३५ मधील बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.
राजूर : शेतातील बांधाच्या वादावरून चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथे शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. अंबादास बाबूराव मिसाळ (३५) असे मयताचे नाव आहे.
जानेफळ दाभाडी येथील संशयित शिवाजी जयाजी मिसाळ व त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा गट क्रमांक ३५ मधील बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघेही शेतात घर करून राहतात. शुक्रवारी दोघात बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला. वाद शमल्यानंतर अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन दुपारी समजूत काढली. नंतर तेथून बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर अंग टाकले. संशयित शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास जागीच गतप्राण झाले. नातेवाइकांनी अंबादास यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृतघोषित केले. घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांच्यासह फौजदार शिवाजी देशमुख, जमादार जनार्दन भापकर, नरहरी खार्डे, गणेश मान्टे, राहुल भागिले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत.