शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 07:06 PM2022-03-09T19:06:07+5:302022-03-09T19:06:20+5:30

गाव शिवारात एका शेतात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Murder of one by sharp weapon in agricultural dispute; Police arrested the two | शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

googlenewsNext

जालना : धारदार शस्त्राने वार करुन एका ४५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सोमीनाथ शामराव जाधव (४५) असे मयताचे नाव आहे, अशी माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास मोरे यांनी दिली.

जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील सोमीनाथ शामराव जाधव हे मंगळवारपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी एका शेतात त्यांचा मृतदेह काही ग्रामस्थांना दिसून आला. गाव शिवारात एका शेतात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मौजपुरी पोलिसांना देण्यात आली. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. मोरे यांच्यासह प्रशांत देशमुख व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सोमीनाथ जाधव यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे पोलिसांना दिसले. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी भेटी दिल्या.

शेतीचा वाद असण्याची शक्यता : दोघे ताब्यात
सोमीनाथ जाधव यांचा खून हा शेतीच्या वादातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, पोलिसांनी गावातीलच दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे मोरे म्हणाले.

Web Title: Murder of one by sharp weapon in agricultural dispute; Police arrested the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.