चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून; आरोपी पतीस जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:03 AM2022-03-26T11:03:12+5:302022-03-26T11:03:44+5:30
आरोपी हा जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथील मारुती संपत कळंबे यांच्या शेतात पत्नीसोबत सालगडी म्हणून काम करत होता.
जालना : चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चामरिया बदिया बारेला (२७ रा. शिवल, ता. नेपाननगर, जि. बुऱ्हानपूर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथील मारुती संपत कळंबे यांच्या शेतात पत्नीसोबत सालगडी म्हणून काम करत होता. त्याची पत्नी गर्भवती होती. ४ जानेवारी २०२१ रोजी गर्भवती पत्नी संगीता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला काठीने मारहाण करून जिवे ठार केले. याप्रकरणी शेतमालकाच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांनी केला. तपासाअंति न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अंमलदार अभिजित मोरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश ए.व्ही. चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीला जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील जयश्री सोळंके यांनी काम पाहिले.