पुतण्याचा खून करून फरार झाला; नातेवाईकांकडे येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By दिपक ढोले | Published: December 20, 2023 11:37 AM2023-12-20T11:37:55+5:302023-12-20T11:38:27+5:30
पाच महिन्यांनंतर पोलिसांनी फरार आरोपीस केले जेरबंद
जालना : घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा येथील पुतण्याचा खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीस नातेवाईकाच्या घरून पाच महिन्यांनी घनसावंगी पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले आहे. प्रल्हाद नामदेव पवार असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
३ जुलै २०२३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा येथे फिर्यादी यशोदा पवार, पती सुनिल पवार, सासू बबीता पवार हे घरी होते. त्यांच्या शेजारी राहणारे चुलत सासरे संशयित प्रल्हाद पवार, नामदेव पवार व एक महिला हे फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून वादावादी झाली होती. यातील संशयितांनी फिर्यादीचे पती सुनिल पवार यांच्या मानेवर, दंडावर, पायावर पाठीवर चाकूने सपासप वार करून ठार केले. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पवार हा निघून गेला होता.
मंगळवारी सदरील आरोपी हा नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन, पोउपनि. प्रदीप डोलारे, सुनिल वैदय, विठ्ठल वैराळ यांनी केली आहे.