"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 07:32 PM2024-08-03T19:32:36+5:302024-08-03T19:33:11+5:30
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर मंडल आयोग चॅलेंज होणार, मनोज जरांगे यांचा इशारा
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना): सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी झाली आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माझ्यासमोर बसवा आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा. कुणबी ही मराठ्यांची उपजात आहे. त्यामुळे आम्हाला आऱक्षण दिलंच पाहिजे. नाही तर कुणबी मराठ्यांची उपजात नसल्याचं सिद्ध करा. मग मंडल आयोगही चॅलेंज होईल असं सांगतानाच ज्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं वाटत असल तर पार्श्वभागावर लाथ मारून त्यांना हाकला, अशी स्पष्ट भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. सरकारतर्फे आलेल्या तीन आमदारांच्या शिष्टमंडळासोबत अंतरवाली सराटीत जरांगे यांची आज दुपारी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
मनोज जरांगे यांच्या ७ ऑगस्टच्या दौऱ्यापूर्वी तीन आमदारांचे सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत दाखल झाले. शिष्टमंडळात राजेंद्र राऊत, नारायण कुचे आणि राणा जगजित सिंह यांचा समावेश होता. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, १३ ऑगस्टपर्यन्त सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे आतापर्यंतचा २ महिने वेळ सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या अडून आम्हांला राजकारणात जायचं नाही. आम्ही सरकारला संधी दिली आहे. आमच्या मागण्या मान्य करा आम्ही राजकारणात जाणार नाही. जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग समाजाचं ऐकावे लागेल. कोणतंही काम करायला इच्छा लागते, मात्र सरकारकडे इच्छाशक्ती नाही, असा आरोप जरांगे यांनी केला.
आता आम्ही कोणतेही आरोप सहन करणार नाही
२९ तारखेला आपण तोडगा काढू, समाजात फार रोष आहे. फडणवीस यांचं ऐकून मराठयांना वेड्यात काढू नका, एसइबीसी आरक्षणाची मागणी आम्ही केलेली नाही. हे आरक्षण मिळाल्यावर एकाही मराठ्याने गुलाल उधळला नाही. जे आरक्षण रद्द झालं ते दरेकर यांच्यामुळे रद्द झालं. आरक्षण रद्द होण्याला फडणवीस देखील जबाबदार आहेत, अशी टीका आमदार दरेकर व उपमुख्यमंत्री फडणविस यांच्यावर जरांगे यांनी केली.
२९ ऑगस्टला निर्णायक बैठक
या महिन्याच्या शेवटी २९ ऑगस्टला दिवसभर बैठक होईल. सगळ्यांनी जेवायचे डबे सोबत आणा. संविस्तार चर्चा करू संध्याकाळी ७ वाजेपर्यत चर्चा करू. आम्हाला पाडनं आणि उभे राहणं हे दोन्हीही सोपे आहे. छत्रपतीचा इतिहास दाखवणाऱ्याला देखील यांनी कोर्टात उभे केले. तुम्ही भाजपचे सगळे सीट पाडून टाकणार आहे. मराठा ,धनगर यांना त्रास कसा देता येईल यासाठी फडणवीस यांनी गृहखाते घेतले. आमच्या विरोधात अभियान सुरू आहे. संधी देणं आमचं काम आहे ज्यावेळी आमचे लोक तिथे बसतील त्यावेळी यांना कळेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.
सरसकट आजपर्यंतचे गुन्हे मागे घ्या
आमचे लोक नसताना गुन्ह्यात गुंतवले गेले आहेत. यांनी राजकिय द्वेषापोटी गुंतवले आहे.केसेस होण्याला आम्ही घाबरणार नाही. जेवढ्या केसेस झाल्या तेवढं मराठे पेटून उठले. सरसकट गुन्हे मागे घ्या बाकी आम्हाला मान्य नाही.