माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:32 AM2020-02-17T00:32:17+5:302020-02-17T00:32:38+5:30
अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशीसंगीत महोत्सवाचे.
दर्दी रसिकांनी खचाखच भरलेले सभागृह, वाहवाची दाद आणि उत्स्फूर्त टाळ्यांच्या साथीने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी गायन व वादनाची मेजवानी कानसेन जालनेकरांनी अनुभवली.
गायिका भक्ती गुरव हिने राग यमन सादर केला. तसेच या भवनातील गीत पुराणे हे नाट्यगीतही सादर केले. तिला तबल्यावर विनायक चंदन, संवादिनीवर यश खडके व प्रतिक साळुंके या बालकलाकाराने उत्तम साथ दिली. भारत सरकारची सीसीआयटी फेलोशिप प्राप्त गायिका शाश्वती चव्हाण हिने राग बिहाग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाश्वती चव्हाणने अत्यंत कसदार आवाजात केलेले गायन सर्वांना खूप काळ स्मरणात राहील, असेच होते.
गायक सुधीर दाभाडकर यांनी दोन अभंग व राग भूपमधील बंदीश सादर केली. त्यांना तबल्यावर संभाजी तरासे व संवादिनीवर संदीप गुरव यांनी साथ केली. या महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेले किराणा आणि धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईसखाँ यांनी राग शिवरंजनी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवात संस्कृती मंच (जालना) व कलाश्रीसंगीत मंडळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी नाईक चव्हाण कलाश्री युवा पुरस्कार मराठवाड्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत नामवंत कलावंतांना शाल, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रु. ५ हजार देण्याची सुरूवात करण्यात आली व पहिला बालाजी नाईक चव्हाण कलाश्री युवा पुरस्कार औरंगाबाद येथील ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ फेम गायक सचिन नेवपूरकर यांना जालना नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर यांच्या हस्ते त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याची घेतली गेलेली दखल तसेच नव्याने येऊन पडलेली जबाबदारी असे भावोद्गार सत्कारमूर्ती सचिन नेवपूरकर यांनी काढले.