नवोदय परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकणार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:36 AM2019-04-05T00:36:36+5:302019-04-05T00:36:55+5:30
नवोदयच्या परीक्षेस बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : यावर्षीपासून आॅनलाईन प्रवेशअर्ज घेतल्यामुळे व अनेक पालकांना माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आॅनलाईन ओळखपत्रे मिळत नसल्यामुळे तालुक्यातून नवोदयच्या परीक्षेस बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत
तालुक्यातून एकुण ८८५ विद्यार्थी नवोदयची परीक्षा देणार आहेत. त्याकरीता जि. प. प्रशाला बदनापूर, कन्या शाळा बदनापूर, जि. प. प्रशाला शेलगाव ही तीन परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षेसाठी इयत्ता ५ वी मधील अनेक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले. मात्र, परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना विद्यार्थ्यांना आॅनलाइन ओळखपत्र मिळत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांमधे घबराट पसरली आहे.
या परीक्षेसाठी मागील वर्षापर्यंत आॅफलाइन अर्ज घेण्यात येत होते, यावर्षी प्रथमच नवोदय परीक्षेकरीता आॅनलाइन अर्ज घेण्यात आले. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना याबाबत संगणकीय ज्ञान नव्हते. तसेच हे अर्ज भरताना शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले नसल्याचेही अनेकांनी येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा विषय आमचा नाही, असे सांगून त्यांना नवोदय शाळेत जाण्याचा सल्ला दिला़ या तालुक्यातील वाकुळणी, बाजार वाहेगाव, चनेगाव अशा अनेक गावांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ओळखपत्रे मिळालेली नाही. मात्र, तालुक्यात कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे, याची माहिती येथील गटशिक्षणााधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने, याविषयी चनेगावचे सरपंच उध्दव जायभाये म्हणाले की, आमच्या गावातील ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते विद्यार्थी या परीक्षेला मुकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याविषयी गटशिक्षणाधिकारी एस. एन. कडेलवार म्हणाले की, आमच्याकडे काहींनी ओळखपत्रे मिळत नसल्याची तक्रार केली, यामध्ये संबंधितांनी नवोदय शाळेत जावून चौकशी केली असून, परीक्षेचा अर्ज भरताना काही तांत्रिक चूक झाल्यामुळे हे ओळखपत्र मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना परीक्षेला बसता येणार नाही असे ते म्हणाले.