नवरात्र उत्सवाची जिल्हाभर धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:28 AM2019-09-30T00:28:36+5:302019-09-30T00:28:47+5:30
गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला. जालना शहरातही सकाळपासूनच सार्वजनिक दुर्गा मंडळांनी वाजतगाजत मूर्तीची मिरणूक काढून देवीच स्थापना केली. अंबड, सोमठाणा, मंठा पिंपळगाव रेणुकाई तसेच अन्य प्रसिद्ध देवी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी मोठी यात्रा भरते. जालन्यातही दुर्गादेवी मंदिर, मंमादेवी मंदिर, काळुंका माता मंदिर, तुळजाभवानी मंदिरातही घटस्थापना करण्यात आली.
परतीच्या पावसाने नवरात्र उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला आहे. पिक परिस्थिती चांगली असल्याने शेतकरी देखील समाधानी आहेत. त्यातच आदीशक्तीचा उत्सव म्हणून या नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. या काळा विविध देवींचे मंदिर-ठाणे येथे यात्रा भरतात. गणेश मंडळांप्रमाणे दुर्गा देवी बसविण्याची पध्दत आपल्याकडेही आता चांगलीच रूजली आहे. जालन्यातील विविध भागात युवकांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून देवींची स्थापना केली आहे.
यंदा दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिरांमध्ये रविवारी सकाळी अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.
दररोज दुपारी आणि रात्री भजन, पूजन तसेच देवीचा गोंधळ घालण्याची पंरपरा आहे. अंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानमध्येही रविवारी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.
सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंठा येथील रेणुका देवी संस्थानमध्येही उत्सवास पंरपरागत पध्दतीने प्रारंभ झाला. बदनापूर जवळील सोमठाणा येथील मंदिरातही उत्सवास घटस्थापना करून सुरूवात करण्यात आली. जालन्यातील गांधी चमन येथील काळुंका माता मंदिर, मळ्यातील तुळजा भवानी मंदिरातही उत्सवास प्रारंभ झाला आहे.
नवीन जालना भागातील दुर्गादेवीची मोठी यात्र दरवर्षी नवरात्रात भरते. या भागात रविवारी सायंकाळी पथदिवे बंद होते. तसेच या भागातून जाणा-या वाहतुकीचे नियोजनही कोलमडले होते. नवत्र उत्सवाची रविवारी पहिली माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच महिलांची गर्दी ही लक्षणीय होती.
या महत्त्वाच्या यात्रेकडे जिल्हाधिकारी तसेच जालना पालिकेने लक्ष देणे अपेक्षित होते असे अनेक भाविकांनी सांगितले. किमान पुढील नऊ दिवस तरी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील पथदिवे तसेच वाहतूकची व्यवस्था स्वतंत्र करावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे.