जालना, घनसावंगीत राष्ट्रवादीचा हल्लोबाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:02 AM2017-12-01T00:02:58+5:302017-12-01T00:03:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जालन्यासह घनसावंगी येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
जालना/घनसावंगी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जालन्यासह घनसावंगी येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतक-यासंह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
घनसावंगी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. या वेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळंके, माजी आ. चंद्रकांत दानवे, डॉ. निसार देशमुख, उत्तमराव पवार, महिला अध्यक्षा सुरेखा लहाने, सतीश टोपे, मनोज मरकड, रघुनाथ तौर, नगराध्यक्षा योजना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना टोपे म्हणाले, की भाजप, शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. हा केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचा मोर्चा असून, आगामी काळात संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बाळासाहेब जाधव, संभाजी देशमुख, काशीनाथ मते, रमेश पैैठणे, रवींद्र तौर, तात्यासाहेब चिमणे, श्याम मुकणे, जयमंगल जाधव, नकुल भालेकर, भाऊसाहेब कनके, सुदामराव मुकणे, पंडित धांडगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी चारच्या सुमारास जालना येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. कापसाला हमीभावावर ५०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर जाहीर करावा, रबी पीकविमा आॅफलाईन स्वीकारावा, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शाहआलम खान, एकबाल पाशा, अब्दुल रशीद बबलू चौधरी आदींची उपस्थिती होती.