नाकर्त्या सरकारला धडा शिकविण्यासाठी हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:37 AM2018-01-24T00:37:44+5:302018-01-24T00:38:01+5:30
शेतक-यांच्या जिवावर उठलेल्या नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंठा येथील आयोजित सभेत केले.
मंठा : शेतक-यांच्या जिवावर उठलेल्या नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंठा येथील आयोजित सभेत केले.
येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्तमान सरकारचा निषेध करण्यासाठी हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंतराव पाटील, राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित, गुलाबराव गावंडे, बसवराज पाटील, विजय अण्णा बोराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, बळीराम कडपे, कपिल आकात, अॅड. पंकज बोराडे, भाऊसाहेब गोरे, सतीश टोपे, निसार देशमुख आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले की, युती सरकारच्या काळात समाजातील एकही घटक समाधानी नाही. केवळ घोषणा देणारे सरकार आणि जॅकेट घालून फिरणा-या मंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली आहे. दिल्ली दरबारी महाराष्ट्राची पत राहिली नसून विकासाच्या गप्पा मारणारे सरकार आता जातीय तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही, उलट महाराष्ट्राच्या विकासाची घडी विस्कटली.
या प्रसंगी जयंतराव पाटील, राजेश टोपे, चित्रा वाघ, बळीराम कडपे, निसार देशमुख, भाऊसाहेब गोरे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अॅड.पंकज बोराडे यांनी तर आभार प्रदर्शन कपिल आकात यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
--------------
पाणीपुरवठा नव्हे, वाळू उपसा मंत्री
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सध्याच्या सरकारची कर्जमाफी फसवी असून, सरकारला शेतक-यांच्या प्रश्नाची जाण नाही. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री हे वाळू उपसा मंत्री असल्याची टीका पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे नाव न घेता त्यांनी केली. केंद्र्र व राज्यातील सरकार हे भुलभुलैय्या करणारे असून, त्यांच्या भूलथापांच्या आहारी जनतेने जाऊ नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.