भूमी आणि भूमिकेशी बांधिल साहित्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:04 AM2019-02-18T01:04:29+5:302019-02-18T01:04:44+5:30
भूमी आणि भूमिकेशी बांधिलकी असणारे साहित्य अंतरीच्या उमाळ्याने निर्माण होणे ही काळाची गरज असून, आजच्या साहित्यिक पिढीची ती जबाबदारीही आहे’ असे स्पष्ट प्रतिपादन ख्यातनाम मराठी साहित्यिका समाजशास्त्रज्ञ गेल आॅम्वेट यांनी केले आहे.
प्रा. रावसाहेब ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ‘भूमी आणि भूमिकेशी बांधिलकी असणारे साहित्य अंतरीच्या उमाळ्याने निर्माण होणे ही काळाची गरज असून, आजच्या साहित्यिक पिढीची ती जबाबदारीही आहे’ असे स्पष्ट प्रतिपादन ख्यातनाम मराठी साहित्यिका समाजशास्त्रज्ञ गेल आॅम्वेट यांनी केले आहे.
जालना तालुक्यातील बठाण (बुद्रुक) येथे आयोजित तिसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून गेल आॅम्वेट बोलत होत्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून संमेलनाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक डॉ. बा.आं. मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक देशमाने, निमंत्रक व भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर कुंडलिक देव्हडे, डॉ. रावसाहेब ढवळे, प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे, प्रा. शिवाजी हुसे, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. दिलीप बिरूटे, डॉ. देवकर्ण मदन, महंत सुदाम शास्त्री, प्रा. बसवराज कोरे, रामेश्वर लोया, संयोजक डॉ. शशिकांत पाटील, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. बठाण येथील शिवनेरी मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे भगवा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष गेल आॅम्वेट पुढे म्हणाल्या की, वारकरी संत, सत्यशोधक चळवळीतील म. फुले, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे यांच्यापासून सुरू झालेली साहित्य परंपरा जातीच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाणारी होती. जाती व्यवस्था संपविण्याची प्रेरणा असलेली ही साहित्य परंपरा मानवमुक्तीचा ध्यास घेणारी होती. आजकाम असे साहित्य निर्माण होत असले तरी जास्त प्रमाणातील साहित्य जात, वर्ग, लिंग, सत्ता, संपत्ती इ. गोष्टींनी प्रभावित झालेले दिसते.
बठाण (बु.) येथे संमेलनानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडींने लक्ष वेधले. सजवलेल्या बैलागाडीत भूमिजनांचे प्रतीक असलेले नांगर आणि वखर ठेवून ही दिंडी जेव्हा गावातून निघाली, तेव्हा विविध महापुरूषांच्या वेषातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, पावल्या खेळत भजनी मंडळाचा सहभाग पाहून घरा-घरातील सुवासिनींनी दिंडीचे पूजन आणि सहभाग घेणा-यांचे औक्षण केले. डॉ. अशोक देशमाने यांच्या हस्ते दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जालना येथील शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सचिन हजारे, महंत सुदामशास्त्री, डॉ. सर्जेराव जिगे, प्रा. शिवाजी हुसे, प्रा. शाम मुडे यांच्यासह भाषा, साहित्य, संस्कृती व संशोधन परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विचार मांडण्याच्या, साहित्य लिहिण्याच्या बाबतीत आजचा काळा मोठा कठीण आहे, असे नमूद करून संमेलनाध्यक्ष गेल आॅम्वेट म्हणाल्या की, संत नामदेव, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, सोयराबाई यांना त्या काळात साहित्य निर्मितीत जो त्रास झाला होता, त्यापेक्षाही जास्त त्रास आजच्या काळात होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यांच्या जिवाचे जे बरे-वाईट झाले, सत्य मांडणाºया, परखड विचार लिहिणाºया लोकांना, उघड बोलणा-यांना धोका होऊ शकतो, अशी स्थिती आहे.
यंदाच्या तिस-या साहित्य संमेलनात कोलकत्ता येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाचे न्या. मदन गोसावी यांना भूमिजन जीवनगौरव पुरस्कार; जालना येथील ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांना भूमिजन पत्रकारिता पुरस्कार आणि चाळीसगावचे आदिवासी साहित्यिक सुनील गायकवाड यांना भूमिजन साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या मागची भूमिका विशद करताना निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे म्हणाले की, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यकर्तृत्व तसेच चारित्र्य यांचा आलेख पाहूनच यासाठी निवड केली जाते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विचारांचा जागर आणि शिवजयंती उत्सवाला नीट-सकारात्मक वळण लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. साहित्य क्षेत्रातील विविध प्रवाहांना एकत्र आणून माणसातील ‘माणूस’ जागविणे आणि भाव-भावनांसह भूमीशी नाते घट्ट बनविणे हा आमचा ध्यास आहे.