विज्ञान केंद्राने शेती पद्धती, सूक्ष्म सिंचन क्षेत्रात काम करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:39+5:302020-12-31T04:30:39+5:30
डॉ. लाखन सिंग : शास्त्रीय सल्लागार समितीची ऑनलाइन बैठक जालना : देशातील कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक शेती पद्धती, ...
डॉ. लाखन सिंग : शास्त्रीय सल्लागार समितीची ऑनलाइन बैठक
जालना : देशातील कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक शेती पद्धती, सूक्ष्म सिंचन, हवामान बदलास पूरक तंत्रज्ञान या क्षेत्रांत काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे येथील कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संस्थानचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक बुधवारी ऑनलाइन पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजय अण्णा बोराडे, डॉ. लाखन सिंग, भगवान डोंगरे, सुभाष गायकवाड, शर्मिला जिगे, योगिता खांडेभराड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी.बी. देवसरकर, सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस.बी. पवार, बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी.के. पाटील, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. लाखन सिंग म्हणाले की, देशातील कृषी विज्ञान केंद्रांची कृषी तंत्रज्ञान प्रसारात महत्त्वाची भूमिका असून, कृषी विज्ञान केंद्रांची ओळख देशपातळीवर होत आहे. कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक शेती पद्धती, सूक्ष्म सिंचन, हवामान बदलास पूरक तंत्रज्ञान या क्षेत्रांत काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी बियाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन लागवडीची शक्यता पडताळून पाहणी करण्याच्या सूनचा दिल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे, कृषी विकास अधिकारी बी.एस. रणदिवे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अभिमन्यू मगर, कार्यकारी अभियंता सिंचन आदमाने, महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख उमेश कहाते यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विजय अण्णा बोराडे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राने सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांचा पुढील वर्षाच्या कृती आराखड्यात समावेश करावा. एकात्मिक शेती पद्धती, शेतमालाचे ऑनलाइन मार्केटिंग, बचत गटांच्या मार्केटिंगसाठी मदत, तसेच महिला प्रशिक्षणावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस.व्ही. सोनुने यांनी प्रगती अहवाल व पुढील वर्षाचा कृती आराखडा सादर केला. बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अजय मिटकरी यांनी केले.