NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले
By विजय मुंडे | Published: June 14, 2023 08:01 PM2023-06-14T20:01:28+5:302023-06-14T20:03:34+5:30
जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.
जालना : दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून वडिलांनी मुलीला शिक्षण दिले. वडिलांच्या कष्टाचे चीज करीत त्या मुलीने नीट परीक्षेत ७२० पैकी ६३३ गुण घेत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे एक यशस्वी पाऊल टाकले आहे. कष्टकऱ्याच्या मुलीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिच्यासह तिच्या वडिलांचे, कुटुंबाचे शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणी येत असल्या तरी त्यांनी मुलगी मिस्बाह हिच्या शिक्षणासाठी सतत पाठिंबा दिला. शहरातील उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये मिस्बाहचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. मिस्बाह हिने सातत्यपूर्ण अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के, तर १२ वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळविले. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याची जाणीव असल्याने मिस्बाह हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी सुरू केली. तिने सातत्याने अभ्यास करण्यावर भर दिला. यासाठी तिला उर्दू हायस्कूलचे प्रा. इफ्तेखार यांच्यासह अंकुश सरांचे मार्गदर्शन मिळाले. या परीक्षेचा बुधवारी निकाल जाहीर झाला आणि मिस्बाह हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ६३३ गुण घेऊन घवघवीत यश संपादित केले. वडिलांनी पंक्चर काढत शिक्षणाला हातभार लावला आणि मिस्बाह हिने नीट परीक्षेत ६३३ गुण मिळविल्याने शहरात सर्वत्र या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सर्वांच्या मार्गदर्शनाने यश
डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहून आपण सातत्यपूर्ण अभ्यास केला. आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन, सर्वच गुरुजनांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे.
मिस्बाह खान, विद्यार्थिनी
आनंदाची बाब
पंक्चरचे दुकान चालवून मी कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मुलगी अभ्यासात हुशार असल्याने तिला सातत्याने पाठबळ देत गेलो. आज मुलीने नीट परीक्षेत यश मिळविले असून, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
- अन्वर खान, पालक