संबंधांस नकार दिल्याने जालन्यात महिलेची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:58 PM2018-02-01T23:58:58+5:302018-02-02T10:57:00+5:30
अनैतिक संबंधास नकार देणा-या २५ वर्षीय विवाहितेचा रिक्षा चालकाने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील पुष्पकनगर भागात उघडकीस आली.
जालना : अनैतिक संबंधास नकार देणा-या २५ वर्षीय विवाहितेचा रिक्षा चालकाने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील पुष्पकनगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दिलीप देवधर मिसाळ यास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खून व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा अशोक पवार (२५, रा. पुष्पकनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की सध्या शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाºया रेखा पवार हिचा विवाह देऊळगावमही येथील अशोक पवार यांच्याशी काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. पतीसोबत बेबनाव झाल्यामुळे रेखा या एका मुलास सोबत घेऊन मंठा चौफुली परिसरातील पुष्पकनगरात माहेरी राहत होती. याच भागात राहणारा रिक्षा चालक दिलीप देवधर मिसाळ याच्याशी तिची ओळख होती. बुधवारी रात्री मेडिकलवर जाऊन येते असे सांगून रेखा पवार रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती परत न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती न आढळल्याने रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात भाऊ संतोष शिंदे याने बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गुरुवारी पहाटे आनंद पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस लिंबाच्या झाडाजवळ कचरा वेचणा-या काही महिलांना एका महिलेचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत शाळेच्या शिक्षकांना माहिती दिली. शिक्षकांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक निमिष मेहेत्रे हे कर्मचा-यांसह घटनास्थळी आले. ठसे तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा गळा चिरुन ओळख पटू नये म्हणून चेहरा अॅसिड टाकून पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता. मुलगी बेपत्ता असल्यामुळे शिंदे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. अंगावरील कपड्यांसह शरीर रचनेवरून त्यांनी मृतदेह आपली मुलगी रेखा पवार हिचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
संबंधास नकार दिल्याचा राग
या प्रकरणी रेखा पवार यांचे भाऊ संतोष कचरु शिंदे (३३) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित दिलीप देवधर मिसाळ (रा. पुष्पकनगर) हा काही दिवसांपासून बहीण रेखा पवार हिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. तिने त्यास नकार दिल्याचा राग मनात धरून दिलीप मिसाळ याने बहिणीचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
अंबड चौफुलीहून घेतले ताब्यात
मृत रेखा पवार हिच्या नातेवाईकांनी सर्व हकीगत सांगितल्यानंतर पोलिसांचा दिलीप मिसाळ याच्यावर संशय बळावला. उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकातील कल्याण आटोळे, कृष्णा चव्हाण, अनिल काळे, देवा जाधव, शिवा देशमुख यांनी प्राप्त माहितीच्या आधारे संशयित दिलीप मिसाळ यास अंबड चौफुलीहून ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.