रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग
By विजय मुंडे | Published: July 20, 2024 07:55 PM2024-07-20T19:55:46+5:302024-07-20T19:55:59+5:30
पिंपळगाव शेरमुलकी : दरवाजा जळाला, कार्यालयातील कागदपत्रे बचावली
भोकरदन (जि.जालना) : शेताकडे जाणारा रस्ता तयार करावा, अशी मागणी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने पिंपळगाव शेरमुलकी (ता. भोकरदन) येथील संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी चक्क ग्रामपंचायतीलाच आग लावली. गावातील काहींनी धाव घेत आग विझविली. तोपर्यंत ग्रामपंचायतीचा दरवाजा जळाला होता. सुदैवाने आग अटोक्यात आल्याने कार्यालयातील कागदपत्रे मात्र बचावली.
पिंपळगाव शेरमुलकी गावापासून गव्हाळी शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस पडला की या मार्गावर चिखल होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी, महिलांना शेतात जाताना- येताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त महिला, नागरिकांनी शुक्रवार, १९ जुलै रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळगाव शेरमुलकी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप होते. संतप्त महिलांनी कोणताही विचार न करता थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजासमोर सरपण ठेवून आग लावली. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मात्र, ही बाब लक्षात येताच गावातील काहींनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेत आग विझविली. तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या दरवाजाचा काही भाग जळून खाक झाला होता. सुदैवाने आग आटोक्यात आल्याने कार्यालयातील कागदपत्रे वाचली आहेत. या प्रकारानंतर सरपंच स्वाती राजेंद्र तांबे, ग्रामसेवक आण्णासाहेब जाधव यांनी शनिवार, २० जुलै रोजी हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात झाला नव्हता. दरम्यान, महिलांनी ग्रामपंचायतीला आग लावल्याच्या घटनेने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
महिलांनी दिल्या घोषणा
आंदोलक महिलांनी गावातील आईच्या मंदिरापासून ते गव्हाळी शेताकडे जाणारा पाणंद रस्ता केलाच पाहिजे, ग्रामस्थांना पायाभूत सुविधा दिल्याच पाहिजे, अशा घोषणा देत ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरोधातही रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या.
खोडसाळपणे, हेतुपुरस्सर हा प्रकार केला
गावातील महिलांनी रस्त्याबाबत आमच्याकडे निवेदन दिलेले नाही किंवा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात येणार आहोत, याची साधी कल्पना सुद्धा दिलेली नाही. महिलांनी अचानकपणे येऊन ग्रामपंचायतीच्या दरवाजाला आग लावली. खोडसाळपणे, हेतुपुरस्सर हा प्रकार केला असून, आम्ही महिलांविरुद्ध हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
-स्वाती तांबे, सरपंच, पिंपळगाव शेरमुलकी