ना वादळ, ना वारे; अचानक मुळासकट उन्मळून पडले हनुमान मंदिरासमोरील महाकाय वृक्ष
By महेश गायकवाड | Published: April 6, 2023 04:57 PM2023-04-06T16:57:54+5:302023-04-06T16:59:01+5:30
लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते.
जालना : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील प्रसिद्ध देवळी मारोती मंदिरासमोर असलेले साठ वर्षे जुने महाकाय लिंबाचे झाड हनुमान जयंतीच्या दिवशीच कोसळले. विशेष म्हणजे वादळ, वारे काहीही आलेले नसताना हे झाड मुळासकट उन्मळून पडले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही भाविकाला आणि मंदिराला इजा झाली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय भाविकांनी घेतला होता. त्यामुळे हा दैवी संकेत की योगायोग, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
रांजणीतील देवळी मारोती मंदिर तालुक्यात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याने १ एप्रिल रोजी कीर्तन झाले. यावेळी ६ कोटी खर्चाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यासाठी अनेक दानशूरांनी मदत जाहीर केली. या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजनही भाविकांनी केली. त्यानंतर गुरुवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त एकीकडे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत होती; तर दुसरीकडे या लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते. वादळ, वारे आलेले नसताना हे झाड अचानक बाजूला कोसळले. झाड कोसळण्याआधी कड्कड् आवाज झाल्याने भाविक बाजूला झाले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. केवळ दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे सरपंच राज राठोड यांनी सांगितले. यावेळी महिला, बालके व पुरुष भाविक हजर होते. विशेष म्हणजे हे झाड मूर्तीवर न कोसळता बाजूला कोसळले. त्यामुळे हा प्रकार मंदिर जीर्णोद्धाराची नांदी तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.