नव्याची जंत्री... जुन्याचे विस्मरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:10 AM2018-05-04T01:10:04+5:302018-05-04T01:10:04+5:30
केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचेच असून, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री असे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. हा धडाका सुरू असल्याने सर्वत्र अच्छे दिनचे चित्र निर्माण होत आहे. असे असतानाच या सत्ताधाऱ्यांनी नवीन विकास कामांसोबतच जुन्या विकास कामांचे स्मरण ठेवल्यास विकासाला गती मिळू शकेल.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सद्यस्थितीत जालना हे सत्तेचे अत्यंत महत्वाचे केंद्र बनले आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचेच असून, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री असे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. हा धडाका सुरू असल्याने सर्वत्र अच्छे दिनचे चित्र निर्माण होत आहे. असे असतानाच या सत्ताधाऱ्यांनी नवीन विकास कामांसोबतच जुन्या विकास कामांचे स्मरण ठेवल्यास विकासाला गती मिळू शकेल.
जालन्यात आता देशातील पहिला ड्रायपोर्ट, आयसीटी तसेच सीडस्पार्क येऊ घातला आहे. या तिन्ही प्रकल्पाचे काम आज जरी सुरू असले तरी, हे प्रकल्प पूर्ण होण्यास साधारपणे आणखी दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. यामुळे हे प्रकल्प म्हणजे पुढील वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या रंगीत तालीम आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
आज जिल्ह्यात ख-या अर्थाने सत्तेची गंगा वाहते आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्वच्छता विभागासह पाणीपुरवठा विभागातूनही अनेक महत्वाकांक्षी योजना खेचून आणल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाची योजना म्हणजे मराठवाडा वॉटरग्रीड ही होय, आता ही योजना पूर्ण करण्यासाठी इस्त्राईलमधिल तंत्रज्ञांची मदत होत असून, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.
जिल्हा विकास आराखडाही आता २०० कोटी रूपयांच्या वर पोहोचविण्यात पालकमंत्री लोणीकरांचा मोठा वाटा आहे.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांच्या विभागकडून अलेक योजना आणल्या असून, पशुधनाचा विमा काढण्यासह दुग्धविकासासाठी दूध शीतकरण केंद्राचे नूतनीकरण केले असून, मत्स्यबीजच्या माध्यमातून कडवंचीत विशेष अभियान राबवले.