जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:29 AM2018-11-05T00:29:31+5:302018-11-05T00:30:03+5:30
गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. मंठा तसेच जालन्यात झालेल्या दोन्ही सभांना काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ज्या उत्साहाने हजेरी लावली त्यातून काँग्रेसला पुन्हा अच्छे दिनची आशा पल्लवित झाली आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या काहीवर्षांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली होती. परंतु थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या निवडणुकीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठे यश मिळविले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या आहेत.
एकूणच लोकसभेचा अपवाद वगळता काँग्रेसने युतीसोबत दोन हात करून आपले अस्तित्व सिध्द केले आहे. जालन्यात माजी आ. कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जणूकाही खो-खो चा सामानाच रंगतो. याला अपवाद केवळ २००९ चा म्हणावा लागेल. त्यावेळी अर्जुन खोतकर यांनी विधानसभेची निवडणुक ही घनसावंगी मतदार संघातून लढविल होती. त्यांनी तेथे देखील ८३ हजार मते मिळवून राज्यात शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त मतदान खेचले होते.
२९१४ ची निवडणुकीही कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर तसेच अरविंद चव्हाण यांच्यात चुरशीची झाली होती. ऐन वेळी भाजपने युती तोडल्याचा सर्वात जास्त फायदा हा अर्जुन खोतकरांना झाला आणि त्यांनी बाजी मारली. अरविंद चव्हाण यांना भाजपने उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली होती. आता पुन्हा निवडणुकीचे नगारे वाजण्यास प्रारंभ झाला आहे. आधी दिल्लीसाठीच्या निवडणुकांपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत.
शिवसेने सोबत भाजपला युती करण्याची गरज आता चांगलीच जाणवू लागली असून, त्यांच्या शिवसेनेविषयच्या भूमिकेत यू-र्टन आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात असून, युती होते की, स्वतंत्र लढतात याकडे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मध्यंतरी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाच्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. राजेश टोपेंना लोकसभेची संधी पुन्ह देण्याविषयी चाचपणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडवून घेऊन त्यात एक तर राजेश टोपे किंवा आ. सतीश चव्हाण यांना उमेदवारी देऊन राजकीय जुगार खेळण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी कैलास गोरंट्याल आणि माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांची तोंड भरून स्तुती केल्याने काँग्रेसमध्ये अद्यापही कैलास गोरंट्याल यांचा शब्द महत्वाचा ठरतो, हे दिसून आले. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य अवतरल्यास नवल वाटू नये, परंतु या चैतन्याच्या वातावरणात काँग्रेसच्या नेतृत्वाला सातत्य ठेवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.