पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे
By विजय मुंडे | Published: March 13, 2024 07:31 PM2024-03-13T19:31:32+5:302024-03-13T19:33:36+5:30
जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते.
जालना : पायाभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होत नाही. त्यामुळे आपण रेल्वे विभागासह विद्युत, सिंचन, रस्त्यांची अधिकाधिक कामे करण्यावर भर दिला आहे. त्यातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील काळ हा अमृतमहोत्सवाचा काळ असल्याचे सांगितले आहे. या काळात देशाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहणार असून, यात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. पिटलाईन सुरू झाल्याने जालना रेल्वे स्थानकातून नवीन रेल्वे सुटणार असल्याचेही ते म्हणाले.
जालना येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात १०० कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या पिटलाईनचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे विभागाच्या डीआरएम नीती सरकार, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उद्योजक घनश्याम गोयल, बद्री पठाडे, सिद्धिविनायक मुळे, भास्कर दानवे, आदींची उपस्थिती होती.
जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. पिटलाईनमुळे जालना येथून नवीन गाड्या सोडता येणार आहेत. जालन्यात कामाला येणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी सुरू झालेली छपरा गाडी महत्त्वाची ठरणार आहे. तिरूपती, जनशताब्दी, वंदे भारतही जालन्यातून सुरू केली आहे. मनमाड, नांदेड येथून गाड्या मेन्टेनन्ससाठी येणार आहेत. त्यामुळे रोजगारही उपलब्ध होणार आहे. जालन्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथेही पिटलाईन झाल्याचेही दानवे यांनी सांगितले. संजय देठे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.
मैलाचा दगड रोवला गेला : चव्हाण
जिल्ह्याच्या इतिहासात आज एक मैलाचा दगड रोवला गेला आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून अनेक रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. पिटलाईन महत्त्वाची ठरणार आहे. सात-आठ वर्षाच्या कालखंडात जिल्ह्याचा गतीने विकास झाला आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढतच राहील, असा विश्वास माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.