महिला रुग्णालयातून नवजात बाळ पळवले, जालना शहरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:37 PM2022-02-07T12:37:56+5:302022-02-07T14:12:10+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जालना:शहरातील गांधीचमन येथील महिला रूग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज बारकाईने तपासले. त्यातून ती नेमकी महिला समोर आली असली तरी तिने बुरखा घातल्याने तिची ओळख पटू शकली नाही.
सविस्तर माहिती अशी की, जालना तालुक्यातील पारेगाव येथील रहिवासी शेख रूक्साना अहमेद या महिलेची प्रसुती रविवारी रात्री झाली. तिला मुलगा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुल आणि बाळांतीन सुखरूप होते. संबंधित मुलाचे अपहरण करणारी संशयित महिला ही देखील रात्रीपसून रूग्णालयात असल्याचे शेजारील महिलांनी सांगितले.
या मुलाला उन्हात घेऊन जावे असे रूग्णालयातील स्टाफने सांगितले. त्यामुळे त्या महिलेने मुलाला घेऊन रूग्णालया बाहेर गेली. ती परत आलीच नाही. बाळांतीन महिला ही, थोडी मतिमंद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याच संधीचा लाभ घेऊन संबंधित बुरखाधारी महिलेने मुलाचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले. नवजात मुलाचे अहपरण झाल्याचे कळताच एलसीबीचे निरीक्षक सुभाष भुजंग, कदीम ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. तसेच अन्य ठिकाणी देखील पोलीस कर्मचारी पाठवून त्या महिलेचा शोध घेतला.
पत्ता आणि शहर वेगवेगळे सांगितले
सदरील सीसीटीव्हीतील फुटेजमधून त्याच वॉर्डातील महिलांनी तिला ओळखले. परंतु बुरखा असल्याने चेहरा स्पष्ट दिसला नाही. सदरील महिलेने त्यांच्या सोबत चहा देखील घेतला. सकाळी सहा वाजेच्या दरम्यानचे फुटेज महत्वाचे असल्याचे दिसून आले. त्या महिलेने आधी सोनलनगर आणि नंतर दुसऱ्या महिलेला चंदनझिरा तसेच औरंगाबादचे असल्याचे सांगितले. पाच वर्षानंतर घरात मुलगा झाल्याचा आंनद होत असेल्याचेही त्या महिलेने सांगितल्याची माहिती पोलीसांना दिली.