नवविवाहित गर्भवती जावांचा विहिरीत अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:44 AM2017-11-28T00:44:11+5:302017-11-28T00:44:27+5:30
घनसावंगी : शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या दोन नवविवाहित गर्भवती जावांचा सोमवारी सकाळी विहिरीत पडून मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र ...
घनसावंगी : शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या दोन नवविवाहित गर्भवती जावांचा सोमवारी सकाळी विहिरीत पडून मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथे ही घटना घडली. जयश्री अंगद बुधनर (१९) व मुक्ता पोपट बुधनर (१९) अशी मृत महिलांची नावे आहेत.
जयश्री व मु्क्ता सकाळी कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या होत्या. दोघीही अकराच्या सुमारास बाजूच्या शेतातील रामेश्वर शिंदे यांच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेल्या. त्या वेळी विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. शेतमालक शिंदे दुपारी विहिरीवर गेले असता, त्यांना विहिरीजवळ दोघींच्या चपला व पाण्यावर कपडे तरंगताना दिसले. शिंदे यांनी दोघींचे नातेवाईक नामदेव वायशे यांच्याशी संपर्क साधला. स्थानिक नागरिकांनी दोघींचे मृतदेह बाहेर काढले. दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी पंचनामा केला.
घटनेची माहिती मिळताच जयश्री व मुक्ता यांच्या माहेरीकडील दीडशे ते दोनशे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. सासरकडील व्यक्तींवर गुन्हा दाखल करीत नाहीत, तोपर्यंत दोघींचेही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी रात्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे काही वेळ तणाव होता.
रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणे यांनी घनसावंगी पोलीस ठाण्याला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना कारवाईचे आश्वासन दिले.
या प्रकरणी मुक्ताचे वडील नामदेव मदने (रा. सेलू) व जयश्रीचे वडील रामदान मासाळ (रा.जिंतूर) यांच्या फिर्यादीवरून सासरकडील अंगत बुधनर, पोपट बुधनर, रामचंद्र बुधनर, मनोहर बुधनर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुनील बोडखे तपास करीत आहेत.
---------------
दोघीही होत्या गर्भवती
दोघींचे नातेवाईक संतप्त झाल्यामुळे पोलिसांनी तणावाच्या वातावरणातच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात हलविले. शवविच्छेदनात जयश्री चार तर मुक्ता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.