सरपंचपदाच्या खुर्चीसाठी रात्रीचा खेळ चाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:36+5:302021-01-23T04:31:36+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभव स्विकारावा लागला. तर अनेक नवख्या चेहऱ्यांना मतदार राजाने ...
पारध : भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभव स्विकारावा लागला. तर अनेक नवख्या चेहऱ्यांना मतदार राजाने संधी दिली आहे. आता सर्वांचे लक्ष सरपंच आरक्षण सोडतीसह सरपंचपदी वर्णी कोणाची लागते याकडे लक्ष लागले आहे. सरपंच आपल्याच पक्षाचा व गटाचा होण्यासाठी निवडून आलेले सदस्य, नेते व कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
सध्या गावागावात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकांवर जोर वाढलेला दिसून येत आहे. पारध परिसरातील पारध (बु), पारध खुर्द, पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, जळगाव सपकाळ, वालसावंगी, धावडा, वडोद तांगडा यांसह अनेक गावांमधील निवडणुकी चुरशिच्या झाल्या आहेत. तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या व प्रतिष्ठित असलेल्या ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. शिवसेना व काँग्रेस पक्षानेही काही ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणुकी अगोदर सोडत पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु, निवडणूक काळात शासनाने या निर्णयात बदल केला. निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. आता ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षण सोडत व सरपंच निवडीकडे आहे.
चौकट
ग्रामपंचायत म्हणजे गावचे मिनिमंत्रालय असते. विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतकडे येतो. त्यामुळे सरपंच आपल्याच मर्जीतील असावा, सरपंच पदाची संधी मलाच मिळावी, अशी अपेक्षा नवीन प्रत्येक सदस्यांची असून, अनेकांनी छुप्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष करून भाजपातील निवडून आलेल्या सदस्यांनी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे तर राष्ट्रवादीतील विजयी उमेदवारांनी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडे प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात केली आहे.