इन्कमटॅक्स कॉलनी भागात अवतरले महादेवाचे नऊ अवतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:10+5:302021-09-15T04:35:10+5:30
विजय मुंडे जालना : शहरातील इन्कमटॅक्स कॉलनी भागातील श्रीकांत चिंचखेडकर यांनी गणेशोत्सवात देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याची परंपरा मागील १८ ...
विजय मुंडे
जालना : शहरातील इन्कमटॅक्स कॉलनी भागातील श्रीकांत चिंचखेडकर यांनी गणेशोत्सवात देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याची परंपरा मागील १८ वर्षांपासून जपली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात चिंचखेडकर यांनी महादेवाच्या नऊ अवतारांचा देखावा उभा केला असून, कोरोनातील सूचनांचे पालन करीत या देखाव्याचे दर्शन भक्तांना घेता येत आहे.
जालना शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रत्येक वर्षी विविध देखाव्यांसह सामाजिक उपक्रमांद्वारे जनजागृतीचे काम करतात. याचाच एक भाग म्हणून इन्कमटॅक्स कॉलनी भागात राहणारे श्रीकांत चिंचखेडकर हे मागील १८ वर्षांपासून देखाव्यातून प्रबोधन करीत आहेत. गणेशोत्सवात घरीच विविध प्रकारचे देखावे चिंचखेडकर तयार करतात. आजवर त्यांनी जागर स्त्रीशक्तीचा, दशावतार, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, नाशिक येथील काळाराम मंदिर, अष्टविनायकांची मंदिरे, स्वामी नारायण मंदिर, श्रीकृष्ण लिला, राम दरबार आदी देखावे साकारले आहेत. मागील वर्षी त्यांनी विठोबा आणि वारकऱ्यांचा देखावा उभारला होता.
मागील वर्षी आणि यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. ही बाब पाहता कोरोनातील सूचनांचे पालन करीत यंदाही चिंचखेडकर यांनी महादेवाचे नऊ अवतार देखाव्यातून उभा केले आहेत. शरब, वीरभद्र, कृष्णदर्शन, अर्धनारीनटेश्वर, नटराज, खंडोबा, रामभक्त हनुमान, गृहपती, नंदीकेश्वर हे नऊ आकर्षक अवतार त्यांनी आपल्या कलेतून साकारले आहेत. कोरोनाचे गांभीर्य पाहता यू-ट्यूबसह सोशल मीडियाद्वारे ते या देखाव्यांचे सादरीकरण करीत आहेत. देखावे पाहण्यास प्रत्यक्ष येणाऱ्यांनाही मास्क वापरासह कोरोनातील प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याच्या सक्त सूचना चिंचखेडकर करीत आहेत. त्यांचे हे देखावे शहरवासीयांसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहेत.
चौकट
पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर
महादेवाचे नऊ अवतार तयार करण्यासाठी श्रीकांत चिंचखेडकर यांनी विविध पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला आहे. यात बांबू, कागद, कापूस, खळ आदी वस्तू वापरल्या आहेत. हा देखावा गणेशोत्सवात उभा करण्यासाठी त्यांना जवळपास एक महिनाभर पूर्वतयारी करावी लागली आहे.
कोट
शहरातील सर्वधर्मीय नागरिक गणेशोत्सव एकत्रित येऊन साजरा करतात. या गणेशोत्सवात समाज जागृतीचे काम करावे, या हेतूने आपण गत १८ वर्षांपासून देखावे तयार करीत आहोत. हे देखावे तयार करताना कुटुंबातील सदस्यांची साथ मिळते. शिवाय देखाव्यांमधून समाज प्रबोधनाचे कामही करता येते.
श्रीकांत चिंचखेडकर, जालना
फोटो