वर्षभरात काढले नऊ हजार पासपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:26 AM2019-03-26T00:26:24+5:302019-03-26T00:26:44+5:30
गेल्या वर्षभरात नऊ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परदेशात जाऊन शिक्षण तसेच नोकरी करण्याकडे आता भारतीयांचा कला वाढला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पासपोर्ट काढता यावा यासाठी येथील इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे पदाधि कारी राहुल शिंदे यांनी मोठा पाठपुरावा करून जालन्यातील पोस्ट आॅफिसमध्ये पासपोर्ट काढण्याचे केंद्र सुरू केले. या केंद्रातून गेल्या वर्षभरात नऊ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांची जवळपास पावणेतीन कोटी रूपयांची बचत झाली आहे.
केरळमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट काढण्यासाठीचे केंद्र आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ते सुरू करावेत म्हणून, राहुल शिंदे यांनी पाठपुरावा केला. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी
नागपूर अथवा मुंबईला जावे लागत असे. त्यामुळे प्रवास खर्च, वेळ तसेच अन्य अडचणी येत असत, हे टाळण्यासाठी प्रारंभी शिंदे यांनी संबंधित विभागाकडे अर्जफाटे केले. मात्र, त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे शिंदे यांनी थेट औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्रानेही प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट काढण्यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याचा आदेश दिला होता. विशेष म्हणजे ही जनहित याचिका दाखल करताना न्यायालयाने त्यांच्याकडून कोर्ट फीसही घेतली नव्हती. शिंदे यांच्याकडून अॅड. सोळंके यांनी बाजू मांडली होती.
गेल्या वर्षी जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयात हे पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू झाले. त्यासाठी विद्यमान खासदारांनी देखील केंद्र पातळीवर मदत केल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे.
एकूणच वर्षभरात जालन्यातील नागरिकांना अत्यंत सोप्या पध्दतीने हा पासपोर्ट काढता आला. त्यामुळे एक तर नागरिकांचा वेळ आणि पैसा अशी दोन्हींची बचत झाली. पूर्वी नागपूर अथवा मुंबई येथे जाण्यासाठी किमान तीन हजार रूपयांचा खर्च एका व्यक्तीला येत होता. तो खर्च वाचला असून, खर्चा सोबतच वेळेची मोठी बचत झाल्याचे सांगण्यात आले.
आज अनेक जण कुठल्याही प्रकरण हे सरकारनेच पूर्ण करावेत अशी अपेक्षा करतात. परंतु सरकार म्हणजे एक वटवृक्ष असतो. त्याच्या पारंब्या दूरवर तर गेलेल्या असतात, मात्र, त्यांना कुठे काय करावे याचा ताळमेळ नसतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या हक्कांबाबतीत स्वत: जागृत राहणे गरजेचे आहे. कोणतीच गोष्ट सहजा-सहजी मिळत नाही. त्यासाठी प्रशासकीय, न्यायालयीन संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. ती आपण ठेवली आणि त्यात सर्वांच्या सहकार्याने यश आले. आज जालन्यात हे केंद्र सुरू होऊन नागरिकांना मदत होत असल्याचे मोठे समाधान आपल्याला आहे.
- राहुल शिंदे, जालना