पूर्णा नदीवरील निझामकालीन पूल कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 04:24 PM2019-11-20T16:24:46+5:302019-11-20T16:27:48+5:30
सन १९३४ च्या दरम्यान हा पूल दळणवळणाच्या साधणासाठी जालना- जळगाव मार्गावर येथील पूर्णा नदीपात्रात उभारण्यात आला होता.
केदारखेडा (जालना) : येथील पूर्णा नदीवरील निझामकालीन पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. हा पूल जालना- जळगाव मार्गावरील आहे.
सन १९३४ च्या दरम्यान हा पूल दळणवळणाच्या साधणासाठी जालना- जळगाव मार्गावर येथील पूर्णा नदीपात्रात उभारण्यात आला होता. परंतु, मागील बारा वर्षांपूर्वी पूल जिर्ण झाला असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. बांधकाम पूर्ण होताच नविन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पूलाचाच वाहतुकीसाठी वापर करित होते. यामुळे तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सा. बां. विभागाने जुन्या पुलावरून होणारी वाहतुक बंद असल्याचे फलक पूलाच्या दोन्ही बाजूने लावले होते. तरिही पुलावरून दुचाकीस्वारांसह काही वाहनचालक जात होते. वाळुची अवैध वाहतुक करणारे वाहनचालकही याच पुलाचा वापर करित होते.
गत महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे पूर्णा नदिला पाणी वाहत आहे. याच दरम्यान या पूलावरून अवजड वाहने जात असल्याने बुधवारी सकाळी अचानक पूल कोसळला. सुदैवाने पूल कोसळताना पूलावर कोणीही नव्हते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथे भेट दिली. पुलाच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पूलावरील वाहतुक बंद करण्यात आली.
उत्खननामुळे पडला पूल
पूर्णा नदीवरील दोन्ही पुलाच्या खाली अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे निजामकालीन पुलाचा पाया उघडा पडून पुलाला धोका निर्माण झाला होता. याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. यातच या पुलावरून वाळू वाहतुक करणारे वाहने जात होती. यामुळे हा पूल पडला असल्याचे सांगितल्या जात आहे. यापुढे नविन पूलाखालील वाळू उत्खन रोखण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
पुलावरून अवैध वाहतूक सुरुच होती
सदरील पूल जिर्ण झाल्याने नविन पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पूलाचाच वापर करित होते. यामुळे आम्ही जुन्या पुलाच्या दोन्ही बाजुनी वाहतुकीसाठी पूल बंद असल्याचे फलक लावले होते. मात्र, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांनी ही फलके काढुन फेकून दिली होती. वाहतुकीसाठी याच पूलाचा वापर करित होते. शिवाय पुलाखालून वाळू उपसा होत असल्याचे आम्ही भोकरदन तहसीलदारांना सांगितले होते.
- डी. एन. कोल्हे, उपअभियंता. सा. बां. विभाग.