ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:54 PM2020-03-24T23:54:25+5:302020-03-24T23:54:51+5:30
जालनेकर अद्यापही कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नाहीत. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालनेकर अद्यापही कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नाहीत. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील वाहनांसह पादचाऱ्यांची वर्दळ कायम होती. सीमावर्ती भागात तब्बल ३२ ठिकाणी चेकपोस्ट तयार करून येणा-या- जाणा-या वाहनांची तपासणी केली जात आहे. तर जालना शहरातील विविध भागांत ९ ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली जात आहे.
जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ संशयित आढळून आले आहेत. पैकी ४२ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात शनिवारी २१ मार्च रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. मात्र, शनिवारी दिवसभर दुकाने बंद आणि नागरिक रस्त्यावर अशीच अवस्था जालना शहरासह जिल्हाभरात होती. दुसºया दिवशी रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू कडकडीत पाळण्यात आला. मात्र, सायंकाळी ५ नंतर टाळ्या, थाळ्या वाजविण्यासाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांची रहदारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. संपूर्ण राज्यातच असे चित्र असल्याने शासनाने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू केली. किमान संचारबंदीमुळे तरी नागरिक घरात बसून कोरोनाशी लढा देतील, अशी अपेक्षा शासन, प्रशासनाला होती. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यांत पर्यंत तरी जालना शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची रहदारी कायम होती. पोलीस दलाच्या वतीने चौका-चौकात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष पथके शहरभर फिरून आवश्यकता नसताना घराबाहेर फिरू नये, घरात बसावे, असे आवाहन करीत आहेत. मात्र, रस्त्यावरील वर्दळ कायम असून, जालनेकरांच्या मनात ना कोरोनाची दहशत ना संचारबंदीची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हातात दांडुका घेऊन सक्ती केल्यानंतच रस्ते निर्मनुष्य होणार का, असाच प्रश्न आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले आहे.
पालेभाज्या, फळे, किराणा साहित्य इ. जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, तोंडाला मास्क न लावणे, एकाच ठिकाणी पाचहून अधिक जण जमा न होणे यासह इतर दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.