यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: June 13, 2024 04:13 PM2024-06-13T16:13:01+5:302024-06-13T16:14:24+5:30
मराठा आरक्षणासाठी एक महिन्यांचा वेळ, मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित
जालना : आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसीतील आरक्षण द्यावे. आमच्या मागण्यांसाठी आजपासून सरकारला एक महिन्यांचा वेळ देतो. परंतु, मागण्या मान्य न झाल्यास आपण निवडणुकीत उतरणार आणि नावे घेवून उमेदवार पाडणार असा इशारा देत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले. जरांगे पाटील यांनी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाला एक महिन्याचा वेळीही दिला आहे.
शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खा. संदीपान भुमरे, आ. राणा पाटील, आ. राजेंद्र राऊत यांनी गुरूवारी दुपारी जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, सापडलेल्या ५७ लाख नोंदींचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा पारित करावा, हैदराबादचे गॅझेट लागू करावे, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे, अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला रद्द न करता वारंवार कुणबी नोंदी शोधण्यास सूचित करावे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावेत यासह इतर मागण्या जरांगे पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे केल्या. मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण राजकारणात उतरणार, नावे घेवून उमेदवार पाडणार, प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही परंतु, पण नावे घेवून पाडणार, असा इशारा जरांगे यांनी दिला. देसाई यांनी जरांगे यांच्या मागण्यांबाबत एक महिन्यांचा वेळ शासनाला मागितला होता. त्यानुसार जरांगे यांनी एक महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले.
उद्याच बैठक घेणार : देसाई
लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात होते. त्यामुळे काही वेळ गेला आहे. आता सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे यासह मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत आपण स्वत: पाठपुरावा करणार आहोत. उद्याच बैठक घेवून चर्चा केली जाईल. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. जरांगे यांच्या तब्येतीची सरकारलाही काळजी असल्याचे देसाई यावेळी म्हणाले.
आता अंतरवाली सराटी नको
अंतरवाली सराटी गावातील सर्वच जातीधर्माच्या लोकांनी मला प्रेम दिलं आहे. परंतु, काहीजण कटकारस्थान रचीत आहेत. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत उपोषण नको, असा संदेश जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांना दिला. आता शासनाने आरक्षण दिलं नाही तर आपणच निवडणुकीत उतरणार असल्याचा पुर्रूच्चारही त्यांनी कला.