हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 01:54 PM2024-06-16T13:54:15+5:302024-06-16T13:54:44+5:30
हाके व वाघमारे यांची प्रकृती खालावली; उपोषणाचा चौथा दिवस
वडीगोद्री ( जालना ) : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं, या मागणीवर ठाम असलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. हाके यांचा बीपी वाढला असून उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने सकाळी दोन्ही उपोषणकर्त्यांची तपासणी केली. यामध्ये लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती गोंदी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बिराजदार यांनी दिली.
काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांची ओपिनियन आवश्यक आहे मात्र उपचार व इतर तपासणी करण्यास हाके यांनी नकार दिला आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, असे जोपर्यंत मुख्यमंत्री व राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे हाके यांनी सांगितले.
"कसा धक्का लागणार नाही, हे महाराष्ट्राला सांगा"
मुख्यमंत्र्यांनी फोन करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सांगितले असले तरी तो कसा लागणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणं आवश्यक असून कायद्याला धरून नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल, हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगावं, असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्याचा आलेला फोन हा विषय नौटंकी - नवनाथ वाघमारे
मुख्यमंत्र्यांना ओबीसी एससी, एसटी समाजाचा द्वेष आहे का असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप उपोषण करते नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे. मुख्यमंत्री हा सर्व जाती धर्माचा असतो, पण हे मुख्यमंत्री इतिहासातील सर्वात जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्र्याचा आलेला फोन हा विषय नौटंकी आहे, त्यांना जर काळजी असती तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी जिल्हाधिकारी पाठवले असते, असे नवनाथ वाघमारे म्हणाले.